कोरोना व्हायरस लॉक डाउन (Lockdown) मुळे जसा लोकांच्या कामावर परिणाम झाला आहे, तसेच मंदिरांमध्ये येणाऱ्या देणग्यांवरही परिणाम झाला आहे. लॉक डाऊनमुळे शिर्डी येथील साई बाबा मंदिर ट्रस्टला (Shirdi Sai Baba Mandir Trust) दररोज दीड कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. शिर्डीच्या या मंदिरात वर्षाकाठी 600 कोटी रुपये देणगीद्वारे येतात, म्हणजेच बाबांच्या चरणी रोज एक कोटी 64 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते. मात्र आता मंदिर बंद झाल्यानंतर 17 मार्च ते 3 मे या कालावधीत केवळ 2 कोटी 53 लाख आणि काही हजार रुपये ऑनलाईन देणगीद्वारे आले आहेत. म्हणजेच दररोज 6 लाख रुपये देणगी मिळाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबाबत माहिती दिली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लॉकडाऊन अशाप्रकारेच सुरू राहिले आणि ते जूनपर्यंत चालले तर मंदिराच्या ट्रस्टला 150 कोटींपेक्षा जास्त नुकसान होईल. सामान्यतः दिवसाला 40-50 हजार भक्त बाबांचे दर्शन घेतात व पेटीमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त देणगी जमा होते, जी बहुतेक रोख स्वरूपात असते. मात्र आता हे प्रमाण खूप कमी झाले आहे. लॉक डाऊनमुळे भक्त ऑनलाईन बाबांचे दर्शन घेऊन देणग्या देत आहेत. डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 दिवसांत सुमारे 35 लाख भाविकांनी घरात बसून टाटा स्कायद्वारे मंदिरातील कार्यक्रम पाहिले आहेत. सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड केला आहे. तसेच रोज सुमारे नऊ हजार भाविक साई बाबांच्या संकेतस्थळाला भेट देतात.
साई संस्थेकडे सध्या बँकेत 2300-2400 कोटी रुपये जमा आहेत, ज्यावर दरवर्षी व्याज म्हणून 100-150 कोटी रुपये मिळतात. (हेही वाचा: CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मदत करण्यासाठी आवश्यक माहिती, बँक खाते क्रमांक, पोचपावती, पद्धत)
दरम्यान, शिर्डीची साई बाबा संस्था अनेक सामाजिक कार्ये करते. शिर्डी संस्था दरवर्षी 40 कोटी रुपये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू वर खर्च करते, जे कमी किंमतीमध्ये भक्तांना दिले जातात. त्यानंतर, शिर्डी संस्थान दरवर्षी हजारो लोकांना विविध आजारांवर नि:शुल्क उपचार देते. शिर्डी संस्था गरीब मुलांच्या शिक्षणावरही मोठा खर्च करते, यासाठी 15 कोटी रुपये खर्च केले जातात. जवळपास 8000 कर्मचारी बाबाचे मंदिर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तिथली व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात. साई संस्था यावर दरवर्षी 160 कोटी खर्च करते.