Sharad Pawar and Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कृषी विधेयकांवरून (Farm Bills) मतभेद झाल्याने पंजाबमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने (SAD) मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एनडीएमधूनही (NDA) अकाली दल बाहेर पडला आहे. अकाली दलाने घेतलेल्या निर्णयाचे अनेक राजकीय नेत्यांनी अभिनंदन केले आहे. यातच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील अकाली दलाचे जाहीर अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए स्थापन झाल्यापासून जे मोजके पक्ष भाजपसोबत होते त्यात शिवसेना आणि अकाली दल हे सर्वात प्रमुख पक्ष होते. मात्र, आता शिवसेनानंतर अकाली दलानेदेखील भाजपची साथ सोडली आहे. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

'कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय आपण घेतला आहे त्यासाठी तुमचे अभिनंदन', अशा शब्दांत पवार यांनी अकाली दलाची स्तुती केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभार, असेही पवार यांनी पुढे नमूद केले आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल, पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, खासदार हरसीमरत कौर बादल यांचा नामोल्लेख करत पवार यांनी हे ट्वीट केले आहे. तर, शेतकऱ्यांच्या हितासाठी अकाली दलाने एनडीएशी असलेले संबंध तोडण्याच्या निर्णायाचे शिवसेनेकडून कौतूक करण्यात आले आहे, अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. हे देखील वाचा- Farm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम

संजय राऊत यांचे ट्विट-

शरद पवार यांचे ट्विट-

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू ही तीनही विधेयके गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. ही विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयके राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. आज तिन्ही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून, तिन्ही विधेयकांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.