Sky Dining Hotel (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पुण्यातील (Pune) 'स्काय डायनिंग हॉटेल' (Sky Dining Hotel) चर्चेत आले होते. आकाशात तरंगणाऱ्या या हॉटेलची माध्यमांपासून ते सोशल मिडियापर्यंत होती. आता हा हॉटेलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडला लागून असलेल्या या 'स्काय डायनिंग हॉटेल'साठी कोणतीही परवानगी घेतली गेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब प्रकाशात आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे.

जोपर्यंत हॉटेलसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्याची सूचना या नोटीसद्वारे करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या कासारसाई धरणाजवळ स्काय डायनिंग हॉटेल सुरू करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले. या हॉटेलमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने खुर्चीवर बसल्यानंतर सीट बेल्ट्स लावले जातात. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने डायनिंग हॉल 120 ते 150 फूट उंचीवर उचलला जातो.

या ठिकाणी 22 लोक 360 डिग्रीच्या आसपासच्या नैसर्गिक दृश्याचा आनंद घेत एकत्र जेवू शकतात. आतापर्यंत मलेशिया, सिंगापूर, दुबई या देशात अशा प्रकारची हॉटेल्स आहेत. मात्र महाराष्ट्रात प्रथमच मावळमध्ये आकाश जाधव या तरुणाने हे हॉटेल तयार केले आहे. हवेत तरंगणाऱ्या या हॉटेलची महाराष्ट्रभर चर्चा आहे. काही दिवसातच हे हॉटेल लोकांचे आवडते हॉटेल बनले. (हेही वाचा: Mumbai: देव तारी त्यास कोण मारी! 20 व्या मजल्यावरून खाली पडूनही महिला जिवंत, जाणून घ्या सविस्तर)

मात्र, आता त्याच्या प्रसिद्धीला ग्रहण लागले आहे. या हॉटेलसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे. याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले की, या नोटीसद्वारे संबंधितांना सर्व आवश्यक परवानग्या मिळेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.