इमारत | प्रातिनिधिक प्रतिमा | संग्रहित संपादित प्रतिमा

'देव तारी त्यास कोण मारी', या उक्तीचा प्रत्यय येणारी अनेक उदाहरणे आपण याआधी पहिली असतील. आता मुंबईच्या (Mumbai) मालाड (Malad) परिसरामधून अशीच आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. गुरुवारी, मुंबईच्या मालाड परिसरात एका महिलेला इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने 20 मजल्यांच्या बिल्डींगच्या टेरेसवरून खाली फेकून दिले होते. मात्र ही महिला चमत्कारिकरित्या बचावली आहे. वृत्तानुसार, ती 18 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीच्या शेडवर पडली व तिचा जीव वाचला. आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिड-डेच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय महिला मालाडमधील ब्लू होरायझन टॉवर येथे घरगुती मदतनीस म्हणून काम करते. ती सकाळी 9.45 वाजता काम आटोपून घरी जात असताना, सुरक्षा रक्षक अर्जुन सिंग (35) तिला नवीन रहिवाशाच्या घरी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ आला. अर्जुनने तिला सांगितले की एक महिला 20 व्या मजल्यावर राहायला आली आहे व तिला मदतनीसची आवश्यकता आहे. त्यानंतर अर्जुन या महिलेला 20 व्या मजल्यावर घेऊन गेला.

तिथे गेल्यावर त्याने नवीन राहायला आलेल्या महिलेला फोन केला. तिने फोनवर त्यांना 30 मिनिटानंतर यायला सांगितले व दरम्यान तिचे टेरेसवरील कपडे खाली आणण्यास सांगितले. त्यानंतर अर्जुन या महिलेला घेऊन कपडे खाली आणण्यासाठी गच्चीवर घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने तिला मारहाण केली व टेरेसवरून खाली फेकले. (हेही वाचा: बारामतीतील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा रायरेश्वर किल्ल्यावर मृत्यू)

या दरम्यान आरोपी फरार झाला. पोलिसांनी या महिलेची सुटका केली. घटनेदरम्यान तिला किरकोळ दुखापत झाल्याने तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि नंतर तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. सिंगचा आपल्या हत्येमागचा हेतू आपल्याला माहित नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे आरोपीला अटक केल्यावरच पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतील.