Pune Outer Ring Road: लवकरच सुरु होणार पुण्यातील बाह्य रिंगरोडचे काम; 80 टक्के भूसंपादन पूर्ण, जाणून घ्या सविस्तर
रोड | प्रातिनिधिक प्रतिमा | Photo Credit : Pixabay

पुण्यात रिंगरोड (Pune Outer Ring Road) बांधला जाणार असून, त्यासाठी 80 टक्के भूसंपादन पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिल्हा प्रशासनाने रिंगरोडचा पश्चिमेकडील 65.45 किमी भाग विकसित करण्याच्या उद्देशाने जमीन संपादित करण्यासाठी 2,625 कोटी रुपये नुकसानभरपाईची रक्कम अदा केली आहे. 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळालेल्या आऊटर रिंगरोडचे उद्दिष्ट पुणे शहरातून जाणारी वाहने इतर जिल्ह्यांकडे वळवून शहरातील रस्त्यांची गर्दी कमी करणे हे आहे.

रिंगरोडचे दोन भाग करण्यात आले आहेत- यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील उर्से ते पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील शिवरे हा ७४.०८ किलोमीटरचा भाग ईस्टर्न रिंग रोड म्हणून ओळखला जाईल, तर शिवरे ते उर्से हा परतीचा ६५.४५ किलोमीटरचा वर्तुळाकार रस्ता वेस्टर्न रिंग रोड म्हणून ओळखला जाईल.

या रिंगरोडसाठी जमीन देण्यास अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्यामुळे जमीन संपादन करताना अनेक अडचणी आल्या. नुकसानभरपाईबाबतही वाद होते. मात्र 2023 मध्ये जमिनीचे वाढलेले दर जाहीर करून हे मुद्दे सौहार्दपूर्णपणे सोडवले गेले. जिल्हा प्रशासनाने जमीन संपादित करण्यासाठी आतापर्यंत 2,625 कोटी रुपये भरपाई म्हणून वितरित केले आहेत. मुंबई ते कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर तसेच कोल्हापूर ते नाशिक, अहमदनगर आणि सोलापूरकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि नाशिकहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होते. या रिंगरोडमुळे हीच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी केले जाणार आहे. (हेही वाचा: Pune to Nashik In Just 3 Hours: आता पुणे-नाशिक प्रवास होणार अवघ्या 3 तासांत; दोन शहरांमधील 213 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाला महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल)

या 136.80 किमी लांबीच्या बाह्य पुणे रिंगरोडसाठी एकूण प्रकल्प खर्च अंदाजे 15,857 कोटी रुपये आहे. साधारण 120 किमी प्रतितास वेग असलेल्या वाहनांसाठी डिझाइन केलेला हा रस्ता 90 मीटर ते 110 मीटर दरम्यान रुंदीचा असून, दोन्ही बाजूला तीन लेन असून तो 83 गावांमधून जाणार आहे. यामध्ये 14 इंटरचेंज, आठ पादचारी अंडरपास, सहा लहान वाहनांचे अंडरपास, 13 हलके वाहन अंडरपास, 37 वाहनांचे अंडरपास, 28 वाहनांचे ओव्हरपास, तीन रेल्वे ओव्हरब्रिज, 16 मोठे पूल, 38 छोटे पूल, 230 कल्व्हर्ट (छोटा बोगदा), 10 बोगदे आणि 18 उड्डाणपूल असतील.