Ajit Pawar | (File Image)

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक पदांच्या निवडणूकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशाप्रकारे बिनविरोध निवडून येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. दरम्यान शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे (Satish Kakde) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजित पवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 अर्ज आले होते. बुधवार (8 डिसेंबर) दिवशी अर्ज मार्ग घेण्याच्या मुदतीला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सतिश काकडे यांनी अर्ज मागे घेतल्याने पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदी उपमुख्यमंत्री अजित पवार बिनविरोध निवडून आले आहेत. अजित पवार यांचा बारामती तालुक्यातून अ वर्ग मतदारसंघातून अर्ज आला आहे.

पुणे जिल्हा बॅंक ही महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील अव्वल बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत 7 वेळेस अजित पवार हे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत.

अजित पवार यांच्याप्रमाणेच भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले आहेत. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल आल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.