Doctors | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. यातच पनवेल (Panvel) परिसरातील अष्टविनायक रुग्णालयातील (Ashtavinayak Hospital) डॉक्टरासह अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित डॉक्टरकडे गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधीत रुग्ण आला होता. यामुळे या डॉक्टराला कोरोनाची लागण झाली. तसेच डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या आणखी रुग्णांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.

पनवेल येथील खांदेश्वर वसाहत भागातल्या अष्टविनायक रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेने तत्काळ रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि इतर रुग्णांची करोना तपासणी करण्याची मोहीम राबविली होती. याच तपासणी मोहीमेत सोमवारी रुग्णालयाचे डॉक्टर आणि अजून एका रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे खांदेश्वरमध्ये एकच खळबळ माजली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या 15 दिवसांपासून अष्टविनायक रुग्णालयात अनेक जणांनी उपचार घेतले आहेत. यामुळे स्थानिक लोक आणखी घाबरले आहेत. हे देखील वाचा- मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा घेतला निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबईत तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 4666 वर पोहोचली आहे. राज्यात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत नव्या 466 रुग्णांची वाढ झाली. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, मुंबई महापालिका मुख्यालयातील कर्मचारी यांच्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे.