Neil Somaiya यांना मिळालेली पीएचडी पदवी वादाच्या भोवऱ्यात; होत आहे चौकशीची मागणी, जाणून घ्या कारण
Neil Somaiya (संग्रहित संपादित प्रतिमा)

नील सोमय्या (Neil Somaiya) यांना नुकतेच मिळालेल्या पीएच.डी. (PhD) मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार आणि भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष, किरीट सोमय्या यांचा 31 वर्षीय मुलगा नील सोमय्याला मुंबई विद्यापीठातून पीएचडी मिळाली आहे. नील सोमय्या यांना नोंदणी केल्यानंतर अवघ्या 14 महिन्यांमध्ये आणि प्रबंध सादर केल्यानंतर अवघ्या 45 दिवसांमध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांना ‘व्यवस्थापन’ची पीएचडी मिळाली आहे. नील यांचा विषय Social Media impact on Political Parties असा होता. आता मुंबई विद्यापीठातील पीएचडी संशोधकांनी नील यांना पदवी देण्याच्या तत्परतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी-इच्छूक उमेदवारांनी नील यांच्या प्रक्रियेमध्ये पक्षपाताचा आरोप केला आहे. पीएचडी सारखा प्रतिष्ठित शैक्षणिक सन्मान प्राप्त करण्यासाठी अनेक उमेदवार पाच-सहा वर्षांपेक्षा जास्त काळ व्यतीत करतात, तिथे नील यांना अवघ्या 16 महिन्यात पीएचडी मिळाली आहे. आपल्या नोंदणीची प्रतीक्षा करणारे छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रोहित ढमाले यांनी सांगितले की, व्हायवा (तोंडी परीक्षा) झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नील यांना पीएचडी देण्यात आली, याची नक्कीच चौकशी व्हायला हवी.

किरीट सोमय्या यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या मुलाला पीएचडी मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. त्यानंतर अनेकांनी नील यांचा प्रबंध यूजीसी-मान्य प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाला आहे का? अशी विचारणा केली. याबाबत समधानकारक उत्तर न मिळाल्याने सोमय्या यांच्या संशोधनाच्या बाबतीत इतर उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे.

एका उमेदवाराने सांगितले, पीएचडी उमेदवारांना फेलोशिप, संसाधने इत्यादींच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. एखाद्याचा प्रबंध पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी नोंदणीच्या तारखेपासून किमान तीन ते चार वर्षे लागतात. त्यामुळे नील यांच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली पाहिजे. अधिकृत कागदपत्रांनुसार, सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने 2017 मध्ये सोमय्या यांच्या केंद्रात प्रवेश प्रमाणित केला आहे. नवीन नियमांनुसार उमेदवाराची स्वीकृती तारीख ही नोंदणी तारीख म्हणून विचारात घेतली जाते. (हेही वाचा: Deepotsav 2022: भाजप मुंबईमध्ये करणार 'दीपोत्सवा'चे आयोजन; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण)

याबाबत मुंबई विद्यापीठाचे उपनिबंधक विनोद मालाले म्हणाले की, नील सोमय्या यांची पीएच.डी. नोंदणी 1 जून 2021 रोजी झाली आणि 17 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी प्रबंध सादर केला, म्हणजेच नोंदणीनंतर प्रबंध सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान एक वर्षाच्या कालावधीच्या नियमांमध्ये ही गोष्ट बसत आहे. यासह 29 नोव्हेंबर 2017 रोजीचा रिसर्च सिडनहॅम कॉलेजने पुष्टी केलेला प्रवेश आणि त्यानंतर 17 ऑगस्ट 2022 रोजी प्रबंध सादर झाला, म्हणजेच यामध्ये 4 वर्षे 9 महिन्यांचा कालावधी लागला. ही बाबा देखील नियमांतर्गत आहे.’

नीलयांच्या पीएचडीवर सोशल मिडियावरही प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर वडील किरीट सोम्मैया यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, नील सोमय्या 17 सप्टेंबर 2016 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना 2017/2018 मध्ये सिडनहॅम इन्स्टिट्यूट (कॉलेज) ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रथम वर्ष पीएचडीसाठी प्रवेश मिळाला. त्यानंतर 17 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी मुंबई विद्यापीठात आपला प्रबंध सादर केला व 30 सप्टेंबर 2022 रोजी ओरल परीक्षा (Viva) दिली. त्यानंतर त्यांना 30 सप्टेंबर 2022 रोजी पीएचडी मिळाली.'