Epidemic Diseases | Representational image (Photo Credits: pxhere)

नवी मुंबईमध्ये जुलै महिन्यात दमदार बरसल्यानंतर मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्यात काहीशी दीर्घ विश्रांती घेतली. त्यामुळे वातावरणात बऱ्याच अंशी कोरडेपणा असला तरी विषाणूजन्य संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी नवी मुंबईमध्ये साथीचे आजार (Navi Mumbai Epidemic Diseases) डोके वर काढत आहेत. खास करुन सर्दी (Cough), खोकला, डोकेदुखी, ताप (Fever), अंगदुखी (Body Ache) आदी प्रकार बळावताना दिसत आहेत. साथीच्या आजारांची ही लक्षणे पर्यावरणातील चढउतारांमुळे आहे. परिणामी शहरात ताप, खोकला, अंगदुखी आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची खाजगी रुग्णालये आणि महापालिका आरोग्य केंद्रांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.

अचानक येणारा पाऊस, ढगांचा काळोख, सुर्यप्रकाशामध्ये असणारी अनियमितता आदींमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. खास करुन डासांमुळे होणारे आजार.नागरिकामध्ये रोग प्रतिकारशक्तीचा आभाव असल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे. खास करुन वृद्ध नागरिक आणि लहान मुले. या सर्वांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी आणि इतर अनुषंगिक लक्षणे दिसत आहेत.

शहरामध्ये डोळ्यांशी संबंधित आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे वृत्त आहे. 27 जुलैपासून, तब्बल 1,578 रुग्णांना डोळ्यांच्या विविध समस्यांचे निदान करण्यात आले आहे. ज्यामध्ये डोळे दुखणे किंवा डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी खास करुन जर तापाची लक्षणे आणि वारंवारता अधिक असेल तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ म्हणतात.

साथीचे आजार पसरण्यामध्ये डास मोठी भूमिका निभावतात. पावसाळ्यात आणि इतरही वेळी पाणी साचणारी डबकी, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टीक पिशव्या, रिकामे डबे आणि अडगळीतील वस्तू डासांना अंडी घालण्यास पोषक वातावरण निर्माण करतात. खास करुन डास हे साथीच्या आजारांचे वाहक म्हणूनच काम करतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या वस्तू दिसल्यास त्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. खास करुन सोसायटी, सार्वजनिक ठिकाणे, तसेच शाळा, महाविद्यालये, वृद्धाश्रम, प्रार्थना स्थळे. जेणेकरुन साथिच्याआजारांचा प्रसार होणार नाही, असे अवाहन करण्यात येत आहे.