Breathing Problems In Mumbai: मुंबई शहरात गेल्या दोन महिन्यांत विषाणूजन्य आजारातून (Viral Illness) पूर्ण बरे झाल्यानंतर तीव्र आणि सतत खोकला (Cough) असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हे रुग्ण सहसा खोकल्याच्या सामान्य औषधांना प्रतिसाद देत नसून त्यांना इनहेल स्टिरॉइड्सची आवश्यकता असते. प्रौढांपेक्षा लहान मुलांना खोकल्याची समस्या अधिक असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. शहरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, डिसेंबरपासून मुले आणि प्रौढांना त्रास होत आहे. या रुग्णांना आरामासाठी स्टिरॉइड्सची आवश्यकता आहे. प्रदूषण आणि धुक्याने भरलेल्या हवेच्या श्वासोच्छवासामुळे रुग्णांना याचा दीर्घकाळापर्यंत त्रास होत आहे. याला वैद्यकीयदृष्ट्या पोस्ट-व्हायरल खोकला असे म्हटले जाते, तो वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गानंतर तीन ते आठ आठवडे टिकतो, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 70% मुलांमध्ये विषाणूजन्य आजारानंतर तीन ते आठ आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकणाऱ्या तीव्र खोकल्याची तक्रार जाणवत आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांना आरामासाठी फोराकोर्ट सारख्या इनहेल स्टेरॉईड्सची आवश्यकता असते. कारण खोकला खूप त्रासदायक असतो आणि दैनंदिन कामकाजात याचा जास्त त्रास होतो, असे बालरोगतज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी सांगितले. (हेही वाचा - Latur News: उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टर पती-पत्नीस 40 लाख रुपयांचा दंड)
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ टीकणाऱ्या खोकला उपचार करणे आव्हानात्मक होत आहे. सध्याची मार्गदर्शक तत्त्वे अशी शिफारस करतात की, अनेक प्रकरणांमध्ये, तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला असलेल्या लोकांना इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्स (ICS) दिले जावे. जे सामान्यतः दमा आणि श्वसनमार्गाच्या जळजळ असलेल्या इतर रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात.
केईएम रुग्णालयाचे माजी बालरोग प्रमुख डॉ मुकेश अग्रवाल यांनी सांगितले की, प्रदूषण आणि परिणामी धुक्याचे दाट आच्छादन ही समस्या लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. प्रदूषित आणि धुळीने भरलेल्या हवेच्या वारंवार संपर्कात आल्याने घसा अधिक संवेदनशील बनतो.
डॉ. अग्रवाल म्हणाले की, वरच्या श्वसनाचे आजार सामान्य तापमान वाढल्याने बरे होऊ लागतात. जेव्हा हवेतील प्रदूषणाची पातळी जास्त असते तेव्हा सकाळच्या वेळी एक्सपोजर सर्वात वाईट असते. इंडियन चेस्ट सोसायटी (ICS), चेस्ट फिजिशियन्सची आघाडीची संस्था, चेस्ट फिजिशियन डॉ. संदीप साळवी यांनी सहमती दर्शवली की, व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्समध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. ज्यामुळे दीर्घकाळ खोकल्याची समस्या जाणवत आहे. साळवी यांच्या मते, इनहेल्ड स्टिरॉइड्स ही एकमेव अशी औषधे आहेत जी बरे होण्यास त्वरीत काम करतात.
जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना अधूनमधून न्यूमोनिया आणि सतत खोकला असलेल्या मुलांना दाखल करावे लागले आहे. बालरोगतज्ञांनी सांगितले की डिसेंबर आणि जानेवारीच्या तुलनेत केसेसची संख्या थोडी कमी झाली आहे. अलीकडे, पुणे आणि इतर शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. बांधकाम कार्यात अचानक वाढ झाल्यामुळे हवेतील रासायनिक धूळ वाढली आहे, ज्यामुळे दीर्घकाळ सर्दी, खोकला, सायनुसायटिस, त्वचेच्या समस्या आणि तीव्र श्वसन रोगाची समस्या जाणवत असल्याचं, क्लिनिकल इम्युनोलॉजिस्ट डॉ. विजय वराड यांनी सांगितलं.