Doctor | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (Consumer Disputes Redressal Commission) ऐतिहासिक निर्णय देत लातूर (Latur) येथील एका डॉक्टर दाम्पत्याला (Doctor Couple) तब्बल 40 लाख रुपये दंड ठोठावला आहे. रुग्णावर उपचार करताना निष्काळजीपणा आणि चुकीचे उपचार केल्याने महिलेचा मृत्यू झाला असा ठपका ठेवत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा निर्णय दिला. सदर डॉक्टर दाम्पत्याने केलेल्या उपचारामुळे एकरा 27 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. लातूर जिल्हा तक्रार निवारण आयोगात सुमारे 11 महिने 28 दिवस हे प्रकरण चालले. अखेर डॉक्टर दाम्पत्याला सज्जड दंड ठोठावत महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न झाला.

लातूर जिल्ह्यातील नाणंद येथील रहिवासी रेवती गावकरी या 27 वर्षीय महिलेचा घरकाम करताना अपघात झाला होता. या अपघातात रेवती हिच्या हाताला जबर दुखापत झाली. हाडांनाही मार लागला. त्यावर उपचार करुन घेण्यासाठी रेवती या डॉ विक्रम सूर्यवंशी आणि डॉ श्वेता सूर्यवंशी यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल येथे दाखल झाल्या. जे लातूर येथे आहे. डॉ. सुर्यवंशी या दाम्पत्याने रेवती यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान त्या बेशुद्ध झाल्या. त्या नंतर शुद्धवरच आल्या नाहीत. या प्रकारात डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईक अथवा आप्तेष्टांना कोणतीही माहिती न देता रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे रुग्ण दगावल्याचे स्पष्ट झाले. (हेही वाचा, Washim News: धक्कादायक! ऑपरेशन सुरु असताना लाईट गेली म्हणुन मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने केल्या १० शस्त्रक्रीया)

रेवती या दोन मुलांच्या आई आहेत. आपल्या दोन मुलांसह त्या आपल्या वडिलांकडे राहात होत्या. किल्लारी येथील एका खासगी दुकानात काम करुन त्या महिना नऊ हजार रुपयांच्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाहकरत होत्या. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने दोन्ही मुले उघड्यावर आली. त्यामुळे दोन्ही नातवांची जबाबदारी आजोबांवर आली. दरम्यान, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महिलेच्या वडिलांनी रुग्ण हक्क समितीच्या सहकार्याने ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली. डॉक्टर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली. सर्व साक्षी पुरावे आणि चौकशीच्या आधारे ग्राहक मंचाने अकरा महिने 28 दिवसात निर्णय दिला.