Nashik: नवरी मिळेना नवऱ्याला..! चाळीशीतल्या इसमाने केले सोळा वर्षांच्या मुलीशी लग्न, बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
Child Marriage | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दाखल झालेल्या तक्रार अर्जामुळे पोलिसांनी एका नियोजित बालविवाहाचा (Child Marriage) घाट हाणून पाडला. हा घाट रचण्यात नवरदेव, आणि दोन्ही बाजूकडील कुटुंबीयांचा समावेश होता. या प्रकरणातील नवरदेव चाळीशीच्या घरात आहे. तर नवरी अवघी 16 वर्षंची. लग्न ठरत नाही म्हणून चक्क अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचा हा प्रकार आहे. आबा अहिरे (रा. कुसुंबा) यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करुन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ललीत मैंद-सोनार (वय ३७, रा. गाळणे) हा युवक साधारण वायाच्या चाळीशीत आहे. लग्नासाठी अनेकदा प्रयत्न करुनही त्याचा विवाह जमला नाही. त्यामुळे तो विवाहोत्सुक होता. दरम्यान, त्याने नवपाडा येथील संगीता ठाकरे (वय-16) या मुलीशी विवाह केला. संगीता ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही, या तरुणाने तिच्याशी विवाह केला. (हेही वाचा, चौदाव्या वर्षी विवाहास मान्यता मात्र संसार सुरु करण्यासाठी मुलीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक: मुंबई उच्च न्ययाालय)

दरम्यान, वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात या विवाहाबद्दल तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीत बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तसेच, बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी नवरदेव ललीत मैंद-सोनार (वय 37, रा. गाळणे याच्यासह कन्हय्यालाल ठाकरे (मुलीचे वडील), ज्ञानू बागूल, गोकुळ भोये (तिघे रा. नवपाडा, ता. साक्री) व पिंटूतात्या भदाणे व विवाह जमवणारे मध्यस्त यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.17 जुलै 2020 रोजी हा विवाह पार पडला होता. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीमुळे या प्रकाराला वाचा फुटली.

बदलती समाजव्यवस्था, शिक्षण, तरुणाईच्या बदलत्या आपेक्षा, वास्तव यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने तरुण, तरुणींचा योग्य वेळी विवाह ही एक आता समस्याच होऊन बसली आहे. कायद्यानुसार मुला मुलींचे विवाहाचे वय अनुक्रमे 18 आणि 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या पुढे विवाहाचे योग्य वय किती? हा जरी प्रत्येकाचा वैयक्तीक विषय असला तरीही साधाराण 21 ते 30 या वयोगटात विवाह पार पडण्याचे मुलांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. अनेक तरुणांना विवाहासाठी मुलीच मिळत नाहीत. त्यात ग्रामिण भाग आणि शेती करणाऱ्या तरुणांना मुली मिळणे दुरापस्त होऊन बसले आहे. यातूनच पुढे विवाह जमवून देणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्याचेही पाहायला मिळत आहे.