महाविकाआघाडीचा 'ख्वाडा' सोडवताना देवेंद्र फडणवीस घरच्या मैदानावर चितपट; नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पराभूत
Devendra Fadnavis | (Photo Credits: Twitter)

Nagpur Zilla Parishad Election Results 2019: नागपूर जिल्हा परिषदेत महाविकाआघाडीने भाजपचा अक्षरश: धुव्वा उडवत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घरच्या मैदानावर चितपट केल्याचे पाहायला मिळत आहे. या पराभवानंतर महाविकासआघाडीने घातलेला 'ख्वाडा' सोडवताना देवंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चितपट झाले अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. राज्याच्या राजकारणात नागपूरला अलिकडे आलेले महत्त्व पाहता हा पराभव केवळ भाजपचा पराभव इतकाच मर्यादीत नाही. भाजपची मातृसंस्था म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयसुद्धा नागपूरलाच आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी नागपूरमधून येतात. भाजपचे अनेक महत्त्वाचे निर्णय नागपूरमधूनच घेतले जातात, त्यामुळे घरच्या मैदानावर झालेला पराभव देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दूरगामी परिणाम करणारा ठरु शकतो हे नक्की.

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल पाहता महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी, काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यानंतर मग शिवसेना आणि इतरांचा क्रमांक लागतो. आतापर्यंत हातील आलेल्या निकालावर नजर टाकता एकूण 58 जागांपैकी नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-26, राष्ट्रवादी – 12, भाजप -10, शिवसेना -01, अपक्ष– 01, शेकाप- 0 जागांवर विजयी झाले आहेत. (हेही वाचा, Maharashtra ZP Election Results 2020: जिल्हा परिषद निवडणूक निकाल फक्त एका क्लिकवर; पाहा पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर येथे कोणी मारली बाजी)

नागपूर जिल्हा परिषदेत विजयाची किमान दोन अंकी जागा गाठताना भाजपची चांगलीच दमछाक झाली. नागपूरमध्ये महाविकाआघाडी पॅटर्न परिणामारकरित्या केवळ यशस्वीच नव्हे तर, मोठे यश देणारा ठरला. इथे महाविकाआघाडी पॅटर्न यशस्वी झाल्याने भाजप भुईसपाट झाला.

नागपूर जिल्हा परिषद ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. इथे जिल्हा परिषदेचे 58 गट आणि 13 पंचायत समित्यांसाठी 116 गणांसाठी निवडणूक पार पडली. जिल्हा परिषद गटांसाठी 270 तर, पंचायत समिती 116 गणांसाठी 497 उमेदवार मैदानात होते. प्रामुख्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी आदी राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. सोबत काही स्थानिक आघाड्यांचेही उमेदवार नशीब आजमावत होते.