हॉस्पिटल । Representational Image (Photo Credit: PTI)

नागपूरच्या (Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांमध्ये 25 रूग्ण दगवल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांमध्ये नांदेड (Nanded), औरंगाबाद (Aurangabad) मध्ये देखील अशीच घटना समोर आल्याने आता राज्यातील आरोग्य यंत्रणेवर खरंच प्रश्नचिन्ह उभ राहत आहे.  मेडिकल मध्ये 16 तर मेयो मध्ये 9 रूग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे. नक्की वाचा: Nanded Hospital Deaths: नांदेडच्या 'रुग्णालयात औषधांची, डॉक्टर्स-कर्मचाऱ्यांची कमतरता नव्हती'; दोषी आढळणाऱ्यांवर होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांची ग्वाही .

नागपूरच्या मेडिकल आणि मेयो हॉस्पिटल मध्ये विदर्भासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा मधील अत्यवस्थ रूग्णांचाही भार असतो. या दोन्ही हॉस्पिटल मध्ये 1800 खाटा आहेत. या ठिकाणी 1500 खाटांवर रूग्ण नियमित उपचार घेत असतात. मेडिकल मध्ये 16 तर मेयो मध्ये 9 रूग्ण दगावले आहेत. यामध्ये अनेक रूग्ण हे खाजगी हॉस्पिटल मधून अत्यावस्थ अवस्थेमध्ये दाखल होत असतात.

मेडिकल हॉस्पिटल मध्ये दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी 8 रुग्ण हे खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत या ठिकाणी आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. परंतु 24 तासांतच त्यांचे निधन झाले आहे.

''मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत. औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय." असं ट्वीट करत सुप्रिया सुळेंनी देखील सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

खाजगी रुग्णालया मध्ये रुग्णाच्या स्थितीवर त्याला दाखल करून घ्यायचे की नाही याचा निर्णय होतो तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच दाखल करून घ्यावे लागत असल्याने शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे आकडे अधिक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.