Nanded Hospital Deaths: नांदेडच्या 'रुग्णालयात औषधांची, डॉक्टर्स-कर्मचाऱ्यांची कमतरता नव्हती'; दोषी आढळणाऱ्यांवर होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
CM Eknath Shinde | Twitter

महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दोन दिवसात तब्बल 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये 12 बाळांचा समावेश आहे. या घटनेनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घडल्या प्रकारावर विरोधकांनी राज्य सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. आता नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे, सुविधांच्या, औषधांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचे डीनने सांगितले होते. मात्र याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आले की, रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. रुग्णालयात पुरेशी औषधे होती. तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, नांदेडनंतर आता छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील रुग्णालयातही मृत्युच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) किमान १८ मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली. (हेही वाचा: Nanded Hospital Tragedy: नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर शिंदे गटाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी डीनकडून स्वच्छ करून घेतलं शौचालय)

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या 18 रुग्णांपैकी दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर इतर दोन जण न्यूमोनियाने त्रस्त होते. इतर तीन मृत रुग्णांवर किडनीवर उपचार सुरू होते. यकृत निकामी झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन नवजात बालकेही आहेत.