
मुंबई महापालिका म्हणजेच बीएमसी (BMC) संचालित शिवडी टीबी रुग्णालयात (Sewri TB Hospital) क्षयरोगावर (Tuberculosis) उपचार घेत असलेले 80 हून अधिक रुग्ण (TB Patients) गेल्या चार वर्षांत फरार झाले आहेत. माहिती अधिकार कायद्याखाली मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. नवीन औषधे, लहान उपचार पद्धती आणि अधिक खाटा असूनही, पळून जाणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता हा प्रकार आरोग्य व्यवस्थेला आव्हान देत, असल्याचे अभ्यासक सांगतात. क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रदीर्घ काळ उपचाररपद्धती, औषधे आणि रुग्णालयात मुक्काम करावा लागतो. परिणामी ते कंटाळून जातात आणि अचानक पळ काढतात, असे रुग्णालयातील काही अधिकारी सांगतात.
शिवडी रुग्णालयातून क्षयरोगी पळाले
फरार झालेले रूग्ण सामान्यत: गैर-संसर्गजन्य असतात आणि रूग्णालयाच्या दीर्घ मुक्कामामुळे ते निघून जातात. 2023 मध्ये, मुंबईत 63,575 टीबी रुग्णांची नोंद झाली, जी 2022 मधील 65,747 प्रकरणांपेक्षा थोडी कमी आहे. यापैकी 2023 मध्ये 4,793 रुग्ण आणि 2022 मध्ये 5,698 रुग्णांना औषध-प्रतिरोधक क्षयरोग झाला, ज्यांना सुमारे 18 महिने उपचार आणि दीर्घकाळ रुग्णालयात राहण्याची आवश्यकता होती, असे रुग्णालयातील अधिकारी सांगतात. (हेही वाचा, TB Patients: 1,000 हून अधिक भारतीयांनी क्षयरोग ग्रस्तांना घेतलं दत्तक, सर्वाधिक दत्तक घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल)
अधिकरी सांगतात की, अनेकदा क्षयरोग झालेल्या व्यक्तींप्रती त्यांच्या कुटुंबीयांचे वर्तन योग्य नसते. ते त्यांना वाळीत टाकल्यासारखे बाजूला करतात. ते रुग्णालयात उपचार घेत असतील तर त्यांना भेटायलाही येत नाही. उदा. टीबी रुग्णालयात पाच महिलांसह सुमारे 25 रुग्ण आहेत, जे गेल्या पाच वर्षांपासून घरी गेलेले नाहीत. अशा वेळी अनेक रुग्ण अस्वस्थ होतात आणि सुरक्षा रक्षकांना चुकवून पळून जाण्यात यशस्वी होतात.
पळून गेलेल्या रुग्णांची आकडेवारी
माहिती अधिकारात पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, 2021 ते या मे 2024 दरम्यान रुग्णालयातून 83 रुग्ण पळून गेले. ज्यात 78 पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरटीआय अंतर्गत माहिती मिळवणाऱ्या चेतन कोठारी यांनी सांगितले की, “रुग्णालयातून पळून जाणाऱ्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया
बीएमसीचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी स्पष्ट केले की, हे रुग्ण गैर-संसर्गजन्य आहेत. कधीकधी, रुग्णांना निरीक्षणासाठी आणखी काही आठवडे राहण्यास सांगितले जाते. परंतु ते नकार देतात आणि तेथून निघून जातात. अशा रुग्णांना 'डिस्चार्ज विरुद्ध वैद्यकीय सल्ला' (DAMA) म्हणून गणले केले जाते. असेही त्या म्हणाल्या.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्ण बेपत्ता झाल्याबद्दल पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. बीएमसीचे आरोग्य कर्मचारी रुग्णांना शोधण्यासाठी त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर देखील भेट देतात. विशेष म्हणजे, हॉस्पिटलमध्ये 2021 पासून कोणत्याही आत्महत्यांची नोंद झालेली नाही.