कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या प्रारंभापासूनच महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे. राज्याची राजधानी मुंबईचीही (Mumbai) अत्यंत बिकट स्थिती होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही राज्याने अनेक संकटांचा सामना केला. त्यानंतर देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता तिसऱ्या लाटेचा मुंबई शहरावर फारसा परिणाम होणार नाही असे मुंबई पालिकेला (BMC) वाटत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही.
असे असूनही, कोविड संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी पालिकेची लसीकरण मोहीम उत्तम सुरू आहे. बीएमसीने न्यायालयाला सांगितले की आतापर्यंत मुंबईत 42 लाखांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. तर, 82 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. बीएमसीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शहरावर मोठा परिणाम होईल असे वाटत नाही. बीएमसीने आपल्या लसीकरण मोहिमेच्या आधारे हा अंदाज दिला आहे.
बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या 2,586 लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. तर, अशा 3,942 लोकांना कोविड लसीचा पहिला डोस मिळाला आहे. शहरात लसीकरणाचे काम सुरळीत चालू आहे. तसेच आता लसींचीही कमतरता नाही आणि मुंबई सुरक्षित आहे.
सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठात वकील धृती कापडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. जनहित याचिकेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला आदेश देण्याबाबत नमूद करण्यात आले होते की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या लोकांचे घरोघरी लसीकरण करावे. याचिकेत म्हटले होते की, असे लोक घरातून बाहेर पडून लसीकरण केंद्रापर्यंत जाण्याच्या स्थितीत नाहीत. (हेही वाचा: Yatri App: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सादर केले 'यात्री अॅप'; मिळणार गाड्यांचे आगमन-प्रस्थान, वेळ, तांत्रिक विलंब, बिघाड अशी सर्व माहिती)
महाराष्ट्र सरकारने ऑगस्टमध्ये सांगितले की ते मोहीम सुरू करतील आणि पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून अंथरुणाला खिळलेल्या लोकांचे घरोघरी लसीकरण केले जाईल. केंद्रानेही अशा व्यक्तींचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोरण तयार केले आहे.