Mumbai: काय सांगता? BMC कडे आहेत तब्बल 82,410 कोटींच्या 343 FD, तरी मुंबईमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

भारतामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसी (BMC) चे नाव ऐकले नसेल अशी क्वचित एखादी व्यक्ती असू शकते. बीएमसीबाबत अनेक मनोरंजक गोष्टी तुम्ही याआधी नक्कीच ऐकल्या असतील. संसाधनांच्या बाबतीत ही देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक संस्था आहे. आता नुकतेच बीएमसीने जाहीर केले आहे की या संस्थेकडे विविध बँकांमध्ये 82000 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केलेल्या निवेदनानुसार, बीएमसीकडे खाजगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 343 स्वतंत्र एफडीमध्ये 82,410 कोटींची गुंतवणूक आहे.

या पैशातून बीएमसीला दरवर्षी 1800 कोटी रुपये व्याज मिळते. या अहवालात म्हटले गेले आहे की, या वर्षी 5664 कोटी रुपयांच्या एफडीची मुदत संपली होती, तर या वर्षी प्राप्त झालेल्या 9079 कोटी रुपयांच्या नवीन एफडी करण्यात आल्या. ऑगस्ट 2020 मध्ये, संस्थेकडे 79002 कोटी रुपयांची एफडी होती. बीएमसीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत रिअल इस्टेट आहे. संस्थेची 85 टक्के कमाई जीएसटी भरपाई, मालमत्ता कर, सांडपाणी आणि पाण्याची बिले, डेव्हलपर्सना अतिरिक्त मजल्यांची विक्री आणि गुंतवलेल्या भांडवलाच्या व्याजातून आहे.

एवढी कमाई करूनही मुंबईत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बीएमसीवर टीका केली जाते. चालू आर्थिक वर्षासाठी बीएमसीचे 39,038.83 कोटी रुपये आहे. हा अर्थसंकल्प देशातील अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी त्याचे बजेट 33,441 कोटी रुपये होते. इतके पैसे असूनही बीएमसी ही देशातील सर्वोत्तम स्थानिक संस्था नाही. गेल्या वर्षी, ग्रेटर विशाखापट्टणम नगरपरिषद (GVMC) ला देशातील सर्वोत्तम नागरी संस्थेचा पुरस्कार मिळाला होता. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने या वर्षी जानेवारीत त्यांचा सन्मान केला होता. (हेही वाचा: CM Uddhav Thackeray on BMC: अनधिकृत बांधकामांवर युद्ध पातळीवर कारवाई करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेला सूचना)

बीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत आहे. 227 सदस्य असलेल्या बीएमसीमध्ये 97 नगरसेवक सेनेचे आहेत तर भाजपकडे 83 सदस्य आहेत. काँग्रेसकडे 29, राष्ट्रवादी 8, समाजवादी पार्टी 6, एआयएमआयएमकडे दोन आणि मनसेकडे एक नगरसेवक आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेने आधीच सांगितले आहे की या आगामी निवडणुका ते एकट्याने लढवणार आहेत.