CM Uddhav Thackeray on BMC: अनधिकृत बांधकामांवर युद्ध पातळीवर कारवाई करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेला सूचना
CM Uddhav Thackeray on BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. ते मुंबई महापालिकेच्या (BMC) बैठकीत बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 'अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर कारवाई करावी. ही कारवाई करत असताना कोणाचाही दबाव सहन करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या शिवाय मुख्यमंत्र्यांनी शहरातील पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजबाबतही कारवाई करण्यास सांगितले. डेब्रिज टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी कॅमेरे लावा. त्यात डेब्रिज टाकताना जे कोणी सापडतील त्यांच्यावर कारवाई करा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना काळात आपण खूप चांगले काम केले आहे. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता आणि नागरी सुविधांवर पूर्णपणे लक्ष्य केंद्रीत करा. त्यासाठी योग्य कार्यक्रम आखून कालबद्ध रितीने कार्यपूर्ती करा. त्याच्या माध्यमातून मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण केला जावा, अशी आपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीस पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. (हेही वाचा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य)

शहरातील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईच्या सूचना देत मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आपणास मुंबई शहर हे उच्च दर्जाच्या सुविधा असलेले सुंदर शहर बनवायचे आहे. त्यासाठी रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्तयांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील याच्याकेड लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरायला हवा. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक ती कालमर्यादाही ठरायला हवी, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.