गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) यावरुन एक वाद निर्माण झाला आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या मालिकेतील एका भागामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) चांगलेच संतापले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी ट्विट करत मालिकेतील मराठी कलाकारांसह सर्वांचाच समाचार घेतला आहे. सब टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या या मालिकेत एका एपिसोडमध्ये जेठालालचे वडील बापुजी हिंदी ही मुंबईची भाषा असल्याचे सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे अमेय खोपकर चांगलेच संतापले असून ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (तारक मेहता का उल्टा चष्मा मधून आणखीन एक अभिनेत्री बाहेर; लवकरच होणार बाघा- बावरीच्या लव्हस्टोरीचा End?)
यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशारा देत अमेय खोपकर यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात की, "हेच ते मराठीचे मारक मेहता! मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काहीच चुकीच वाटत नाही, याचीच शरम वाटते."
अमेय खोपकर ट्विट:
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 3, 2020
'तारक मेहता...' ही मालिका अनेक वर्षे सुरु असून यात भारतातील विविध प्रातांतील लोक कसे आनंदाने एकत्र नांदतात हे दाखवण्यात आले आहे. मात्र मालिकेच्या एका भागात प्रत्येकजण आपण आपल्या मातृभाषेतून संवाद साधणार असे ठरतो आणि त्यामुळे विसंवाद निर्माण होतो. पात्रांमध्ये निर्माण झालेला विसंवाद दूर करण्यासाठी बापुजी मध्यस्थी करतात आणि सर्वांना पुन्हा एकत्र आणतात. या दृश्यामध्ये बापुजी मुंबईची भाषा हिंदी असल्याचे म्हणतात. यावरुन अमेय खोपकरांनी आक्षेप घेतला आहे. मात्र या सर्व प्रकरणात सब टीव्हीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.