Mira-Bhayandar Jellyfish: मीरा-भाईंदर समुद्रात वाढत्या जेलीफिशमुळे मच्छिमार आर्थिक संकटात; सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
Photo Credit - Pixabay

 

Mira-Bhayandar Jellyfish: गेल्या काही दिवसांपासून भाईंदर येथील समुद्रात जेलीफिशचे (jellyfish) प्रमाण झपाट्याने वाढले आहे. जेलीफिशचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. शिवाय, अन्य मासळ्यांप्रमाणे जेलीफिशचा वापर आपण खाण्यासाठी करत नाही. त्यामुळे वाढत्या जेलीफिशचा फटका मच्छिमारांना (Fisherman) सहन करावा लागत आहे. यात मोठ्या प्रमाणात मच्छिमारांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहेत. जेलीफिशची संख्या वाढल्यामुळं त्याचा थेट मासेमारीवर परिणाम होत असल्याचे मच्छिमारांनी म्हटले आहे. समुद्रात टाकण्यात आलेल्या जाळी जेलीफिशच्या वजनामुळं खराब होते. जेलीफिशचे वजन खूप असल्याने ते जाळीत अडकल्यानंतर ती जाळी दुरुस्त करावी लागते. (हेही वाचा:Mumbai Jellyfish Attack: जुहू चौपाटीवर जेलीफिशचा सहा जणांना दंश; मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन)

जेलिफीशची विक्री करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरात 90 टक्के पाणी असते तसंच, त्यांना मेंदू, रक्त किंवा हाडे नसतात त्यामुळं त्यांचा खाण्यात वापर होत नाही.अन्य माशांच्या उपलब्धतेवरही त्यांचा परिणाम होत आहे. जाळ्यात जेलीफिश अडकल्यानंतर त्यांना सोडून देण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो, असं एका मच्छिमारांचे म्हणणे आहे. तसंच, जेलीफिश त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर जळजळ होते. अशा परिस्थितीत त्यांना जाळीतून बाहेर काढणे कठिण जाते. (हेही वाचा : Jellyfish On Maharashtra's Konkan Coast: कोकण किनारपट्टीवर जेलीफिशचा वावर; सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांवर संकट)

'मासळीची संख्या कमी झाल्यामुळं मच्छिमार कर्जाच्या विळख्यात आहेत. मासेमारीसाठी गेल्यानंतर जाळ्यात जेलीफिश अडकली तर संपूर्ण प्रवास वाया जातो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी, शेतकऱ्यांप्रमाणेच सरकारने नुकसान भरपाई द्यावी,' अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी केली आहे. बोटीच्या क्षमतेनुसार एका खेपेला खलासी आणि तांडेल यांच्यासह 8-10 जण एक आठवडा ते दहा दिवस मासेमारीच्या प्रवासासाठी निघतात. मात्र अनेकदा बोटी रिकाम्या हाताने परत येतात. त्यावेळी लागलेली मजुरी, प्रवासासाठी आवश्यक वस्तू, डिझेल आणि इतर पुरवठ्यांचा खर्च वाया जातो.