प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

मराठी भाषेचे पावित्र्य जपण्यासाठी आणि महाराष्ट्राला मिळालेल्या या अमूल्य वैभवाचे जतन करण्यासाठी येत्या 1 ते 15 जानेवारी 2020 दरम्यान 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्थांना या कालावधीत विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची खरी ओळख वा महाराष्ट्राची संस्कृती असं म्हटले तरी काही वावग ठरणार नाही. मराठी भाषेचा गोडवा, त्यांचे महत्व अगदी जगभरात पोहोचले आहे. महाराष्ट्रात बाहेरून येणारा प्रत्येक माणूस मराठी भाषा ही कळत-नकळतपणे का होईना पण शिकतोच. या मराठी भाषेचा सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

हेदेखील वाचा- Marathi Bhasha Din 2019: मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा

यात मराठी वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने मराठी भाषेतील तज्ज्ञ, लेखक, वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन तसेच नामवंत लेखकांना आणि संस्थांचा सन्मान करण्यात यावा, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि कथाकथन, माहितीपट व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे राज्य शासनाकडून सुचविण्यात आले आहे.

तसेच वेबसाईट्स, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच खासगी दूरचित्रवाहिन्या या प्रसारमाध्यमांच्या द्वारे मराठी भाषेचे माहात्म्य सांगण्यात यावे असेही शासनाकडून सांगण्यात येत आहे.