Marathi Language Day 2019: 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन (Marathi Rajbhasha Din) म्हणून ओळखला जातो. मराठी (Marathi) भाषेचं एक खास वैशिट्य म्हणजे तिच्या बोलीभाषा. मुंबई, पुणे नाशिक अशा महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये अनेकजण प्रमाणभाषेतील मराठीमध्ये बोलतात पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये दर 12 कोसानंतर संस्कृती बदलते आणि सोबतच भाषादेखील बदलते. मराठीप्रमाणेच प्रदेशागणिक बदलत जाणार्या बोली भाषेची एक वेगळी ओळख आहे. काही लोकांची त्यावरून थट्टा होते पण आजकाल सिनेमा, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये बोली भाषेचा वापर वाढल्याने आता प्रांताच्या सीमा पुसट होऊन अनेकांनी ते शब्द नेहमीच्या बोलण्यात वापरायला सुरूवात केली आहे. मराठी ही एक समृद्ध भाषा असली तरीही त्याच्या 13 खास बोलीभाषांची मज्जादेखील काही और आहे. Marathi Bhasha Din 2019: मराठी आहात? मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!
महाराष्ट्रात कुठे आणि कोणती आणि कशी बोलली जाते मराठी बोली भाषा
- मराठवाडी
कर्नाटक सीमेवर असणार्या महराष्ट्राच्या या भाषेवर कानडी भाषेचा प्रभाव आहे. त्यामुळे थोडे उर्दु, थोडे कारवाचक प्रत्यय यामुळे मराठवाडी बोली भाषा खास होते.
प्रसिद्ध शब्द - चाल्लास, ठिवताव
- मालवणी
कोकण प्रांतात आणि प्रामुख्याने तळकोकणात भाषा अत्यंत मधाळ आहे. हेल काढून आणि अनुनासिक उच्चर यामुळे या भाषेचा गोडवा काही और आहे. मालवणी नाटक आणि दशावतार यामुळे ही बोलीभाषा आज जगाच्या कानाकोपर्यात पोहचली आहे.
प्रसिद्ध शब्द - मराठी भाषेपेक्षा यामध्ये काही वेगळे शब्द आहे. 'घो' म्हणजे नवरा, 'झिल' म्हणजे मुलगा आणि चेडवा म्हणजे मुलगी.
- झाडीबोली
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांना 'झाडपट्टी' म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्यांची बोलीभाषा 'झाडीबोली'. 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजन या भाषेत वापरलीच जात नाहीत.
- नागपुरी
नागपूर, वर्धा, चंद्रपूर या भागांमध्ये नागपुरी भाषा थोड्या वेगळ्या लहेजाने बोलली जाते. या भाषेवर हिंदी आणि उर्दुचा प्रभाव आहे.
- अहिराणी
जळगाव जिल्ह्यामध्ये खास अंदाजात भाषा बोलली जाते.या भाषेत नाद आणि लय असल्याने ती ऐकायलाही खास वाटते. अनेक सहित्यिकांनी त्याचा आपल्या लिखाणात वापर केला आहे.
- तावडी
रावेर, जामनेर या भागामध्ये 'क' ऐवजी 'ख' बोललं जातं. बहिणाबाईंच्या कवितांमध्ये या भाषेचा अनेकदा वापर केलेला दिसून येतो. अहिराणी आणि तावडी सारखी वाटत असली त्यामध्ये फरक आहे.
- आगरी
मध्य कोकणात प्रामुख्याने आगरी भाषा बोलली जाते.कोळी बांधवांमध्ये ही भाषा प्रामुख्याने आढळते त्यामुळे रायगड, ठाणे या भागात अनेकजण आगरी भाषेमध्ये बोलतात.
- चंदगडी
कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभागावर या भाषेचा प्रभाव असल्याने कोल्हापूर शहरामध्ये ही भाषा बोलली जात असते. यामध्ये हेल, सुर आणि व्याकरण वेगळे आहे.
प्रसिद्ध शब्द - मी बाजारात गेले हे वाक्य चंदगडीमध्ये 'मिय्या बाजारास गेल्लो' असे बोलले जाते.
- वर्हाडी
बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' म्हणून वापर केला जातो.
- देहवाली
भिल्ल समाज प्रामुख्याने देहवाली भाषेत बोलताना तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. देहवाली च्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे.
- कोल्हापुरी
मूळात रांगडेपणा हीच कोल्हापुरची ओळख असल्याने त्यांच्या भाषेमध्येदेखील याचा रांगडेपणा दिसून येतो. थोडी खेडवळ आणि तरीही लय काढून बोलण्याची पद्धत असल्याने त्याला खास गोडवा आहे.
- पुणेरी
मराठी भाषांच्या विविध प्रकारांमध्ये पुणेरी मराठी ही व्याकरणशुद्ध म्हणून ओळखली जाते. सहित्य,कलाकार विद्यानगरीमध्ये राहत असल्याने त्याचा प्रभाव येथील स्थानिकांवर दिसून येते.
- बेळगाव
बेळगाव हा देखील सीमाभागावरचा एक प्रांत आहे. कन्नड, चंडगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा सगळ्याच भाषांची येथे भेसळ आहे. अनेक साहित्यिकांना बेळगावी भाषेचा त्यांच्या साहित्यामध्ये समावेश करण्याचा मोह आवरला नाही.
- वाडवळी
उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्य़ात किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली भाषा बोलली जाते. वसई भागातील स्थानिक प्रामुख्याने या भाषेचा वापर करतात.
मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. 'अमृतासही पैजा जिंके' अशा शब्दांत ज्ञानेश्वरांनी या भाषेचं कौतुक केलं होतं. जसा काळ बदलतो तसे भाषेमध्येही बदल होतात. बोली भाषादेखील तितक्याच समृद्ध आहेत. त्याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट बोली भाषेमुळे आपण विशिष्ट प्रांतांची ओळख मोठी करतोय असं त्याच्याकडे पाहून त्याचा संवर्धन करणं आवश्यक आहे.