Nagpur Bank Robbery: आई-वडिलांना गिफ्ट देण्यासाठी लूटली बॅंक, नागपूर येथील 2 तरूणांना अटक
Arrested (Photo Credits: Facebook)

नागपूरच्या (Nagpur) इंदिरानगर (Indira Gandhi Nagar) येथील बरनाल चौकात (Baranal Square) असलेल्या सहकारी बॅंकेत (Co-Operative Bank) शुक्रवारी जवळपास 5 लाखांची चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच्या पोलिसांनी त्यांच्याकडून काही रोख रक्कम आणि दागिनेदेखील जप्त केले आहेत. आरोपींची चौकशी करत असताना पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने आपल्या आई-वडिलांना भेट देण्यासाठी चोरी केल्याचे सांगितले आहे. तर, दुसऱ्या आरोपीच्या आई वडिलांनी त्याला लहान असताना सोडून दिले होते. त्याचा बदला घ्यायचा होता म्हणून त्याने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवल्याचे म्हटले आहे.

अजय बंजारे आणि प्रदीप ठाकूर असे याप्रकरणातील आरोपींचे नाव आहेत. अजय आणि प्रदीप गेल्या अनेक वर्षांपासून सोबत काम करतात. मात्र, या दोघांनी इंदिरा गांधी नगरच्या बरनाल परिसरात असणाऱ्या सहकारी बॅंकेच्या दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बॅंकेच्या लॉकरमधून त्यांनी 4 लाख 78 हजार 998 रुपए आणि ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागण्यांची चोरी केली. एकूण 4 लाख 87 हजार 734 रुपयांची त्यांनी चोरी केली. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी अजय आणि प्रदीप या दोघानीच चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघेही राजस्थानला पलायन करण्याचा विचार करत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचचे वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत साबळे, पंकज लाडे, प्रफुल्ल पारधी, सचिन आंधळे आदींसह पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. हे देखील वाचा- Nashik Rave Party: इगतपुरी मध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; बिग बॉस फेम महिला अभिनेत्रीसह 22 जण ताब्यात

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून केवळ दोन लाख रुपयांची रोकड व मौल्यवान जप्त केले आहे. आरोपींनी उर्वरित पैसे आधीच खर्च केले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजयने चोरीच्या पैशातून आपल्या आईला 50 हजारांचे दागिने आणि वडिलांना 40 हजारांची जूनी कार खरेदी करून दिली. तर, प्रदिपने आपल्या वाटेचे पैसे स्वत: जवळच ठेवल्याची सांगितले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.