California Plane Crash: दक्षिण कॅलिफोर्नियातील फुलर्टन शहरात गुरुवारी एक छोटे विमान एका व्यावसायिक इमारतीच्या छतावर कोसळले आणि त्यात दोन जण ठार तर १८ जण जखमी झाले. फुलर्टन पोलिसांच्या प्रवक्त्या क्रिस्टी वेल्स यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या धडकेमुळे इमारतीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही इमारत मायकेल निकोलस डिझाइन्स या फर्निचर उत्पादक कंपनीच्या मालकीची होती. तेथे शिलाई मशिन व कपडे साठवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जणांना रुग्णालयात नेण्यात आले, तर 8 जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट अवेअरने दिलेल्या माहितीनुसार, हे चार आसनी, सिंगल इंजिन असलेले विमान उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटात कोसळले. जखमी विमानात होते की जमिनीवर हे स्पष्ट झालेले नाही.
येथे पाहा व्हिडीओ:
🚨#BREAKING: Evacuations are underway with a massive response after a plane crashed into an office building or warehouse with reports of casualties
A massive response is currently underway in Fullerton, California, where evacuations are in progress… pic.twitter.com/9j6N7W4mkh
— R A W S A L E R T S (@rawsalerts) January 2, 2025
रस्त्याच्या पलीकडे असलेल्या रुची फोर्ज या चाक उत्पादक कंपनीच्या सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये विमान एका बाजूला झुकून इमारतीत कोसळले आणि त्यानंतर आगीमध्ये काळ्या धुराचे लोट उठताना दिसले.
डिस्नेलँडपासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या फुलर्टन म्युनिसिपल एअरपोर्टजवळ हा अपघात झाला. हा एक जनरल एव्हिएशन एअरपोर्ट आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये विमानतळाजवळ चार आसनी विमान कोसळून दोन जण जखमी झाले होते.
फुलर्टन हे लॉस एंजेलिसच्या आग्नेय दिशेला ४० किमी अंतरावर वसलेले शहर असून त्याची लोकसंख्या सुमारे १,४०,००० आहे.