TRAI On Fake Recharge Offers: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने देशभरातील लाखो वापरकर्त्यांना कडक इशारा दिला आहे. ट्रायने युजर्सना बनावट रिचार्ज ऑफरबद्दल (Fake Recharge Offers) चेतावणी दिली आहे. लोकांना फसवण्यासाठी फ्री रिचार्ज ऑफरचा वापर केला जात असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. वास्तविक, हे सायबर गुन्हेगार (Cybercriminals) ट्रायशी संबंधित असल्याचा दावा करतात आणि वैयक्तिक तपशील विचारतात. त्यासाठी काही ऑफर्सचे आमिषही दिले जाते. ज्यात अनेक लोक अडकतात. यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रायने वापरकर्त्यांना इशारा दिला आहे.
ट्रायकडून कोणत्याही ऑफर दिल्या जात नाहीत -
सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. दूरसंचार विभागाने यावर जोर दिला की, ट्रायकडून कोणत्याही ऑफर किंवा कॉल केले जात नाहीत. वापरकर्त्यांनी अशा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नये. ट्रायने म्हटले आहे की, रिचार्ज प्लॅन्सची माहिती मिळवण्यासाठी वापरकर्त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. जर कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असेल तर वापरकर्त्यांनी थेट टेलिकॉम ऑपरेटरच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करावा. (हेही वाचा - Navi Mumbai: नवी मुंबईतील बिल्डरला सायबर गुन्हेगाराकडून 60 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल)
बँकिंग तपशील चोरीला जाण्याची शक्यता -
ट्रायने चेतावणी देताना म्हटले आहे की, बनावट मोबाइल रिचार्ज प्लॅनचे लिंक सामान्य वापरकर्त्यांना पाठवले जात आहेत. यामध्ये युजर्सना आमिष दाखवले जाते. परंतु प्रत्यक्षात त्यांचा उद्देश बँकिंग आणि वैयक्तिक तपशील चोरणे आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरकडूनच टॅरिफ डीलची माहिती घ्यावी. (हेही वाचा - WFH and Cyber Crime: 'वर्क फ्रॉम होम' करण्याच्या नादात महिलेला 18 लाख रुपयांचा गंडा, सायबर क्राईम द्वारे फसवणूक)
वापरकर्त्यांनी बनावट संदेशांपासून सावध राहावे -
वापरकर्त्यांनी अशा संदेशांपासून सावध राहावे, असं आवाहन ट्रायने केलं आहे. काही संशयास्पद वाटल्यास त्वरित संपर्क करण्याचा सल्ला देखील ट्रायने दिला आहे. वापरकर्त्ये https://Cybercrime.gov.in आणि संचार साथी पोर्टलवर तक्रार करू शकतात. तथापी, ट्रायने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत 100,000 हून अधिक बनावट संदेश टेम्पलेट ब्लॉक केले आहेत.