आनंद साजरा करण्याच्या नावाखाली हुल्लडबाजांकडून नानाविध गोष्टी केल्या जातात. त्याचा निसर्गातील प्राणी, पक्षी आणि किटकांना भायवह त्रास होतो आणि मग ते स्वसंरक्षणार्थ हल्ला करतात. ज्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. लोणावळा (Lonavala) येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गडावर (Ekvira Devi Temple) आलेल्या भाविकांना अशा प्रकारच्याच एका घटनेस सामोरे जावे लागले. एकवीरा गडावर मधमाशांनी हल्ला (Honey Bees Attack) केला. ज्यामुळे अनेक महिला, मुले, बालके आणि भाविकांवर सैरावेरा धावण्याची आणि बचाव करण्याची वेळ आली. या घटनेमध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत. मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी गडावर आली असताना ही घटना घडली.
रंगीत फटाके फोडल्याने माशा बिथरल्या?
लोणावळा येथील एकविरा देवी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गडावर गर्दी करतात. या वेळी भंडाऱ्याची उधळण केली जाते. भाविकांसाठी हा तसा आनंदाचा क्षण असतो. प्रत्यक्षात मात्र, भाविकांमध्ये काही हुल्लडबाज मंडळीही असतात. अशाच हुल्लडबाज मंडळींनी गडावर धुराचे फटाके फोडले. ज्यामुळे त्यातील काही फटाक्यांमध्ये असलेली रसायणे आणि तीव्र आवाज यांमुळे गडावर असलेल्या झाडांवरील मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहोचली. ज्यामुळे पोळ्यावरील मधमाशा बिथरल्या आणि त्यांनी भाविकांवर हल्ला केला. मधमाशांनी अचानक हल्ला चढवत भाविकांना कडकडून चावा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाविकांमध्ये घरबराट निर्माण झाली आणि गडावर गोंधळाची परिस्थिती उद्भवली. (हेही वाचा, राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, चार जण गंभीर जखमी)
कुलाबा येथून आली होती देवीची पालखी
एकवीरा गडावर मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती. या वेळी पालखीसोबत अनेक भक्त आणि तरुण आले होते. यातील काही तरुणांनी गडावर रंगीत फटाके फोडले. ज्यामुळे माशा चिडल्या आणि त्यांनी मोठ्या संख्येने भक्तांवर हल्ला चढवला. हुल्लडबाज तरुणांची एक चूक अनेक भाविकांसाठी महागात पडली. माशा इतक्या चिडल्या होत्या की, त्या बराच वेळ गडावर गोंगावत होत्या आणि सापडेल त्याला आपल्या चाव्याचा प्रसाद देत होत्या. (हेही वाचा, Trekkers Attacked by Bees in Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तरूणांवर मधमाश्यांचा हल्ला; 5 जण गंभीर जखमी)
मधमाशा चावताच भक्त धावले सैरावैरा
अनेक भक्त जखमी
मधमाशांनी हल्ला केला तेव्हा प्रत्यक्ष गडावर असलेल्या काही प्रत्यक्षदर्शांनी सांगितले की, हा हल्ला इतका तीव्र होता की, भाविक सैरावैरा धावत होते आणि आश्रय शोधत होते. यात काही वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन मुले, मली, लहान बाळे यांना मोठा त्रास झाला. अनेक भाविक मधमाशांच्या चाव्यामुळे जखमी झाले. तर काही भाविक चावा चुकविण्यासाठी आश्रय शोधत असताना केलेल्या धावपळीत आणि त्याच कारणासाठी धावत असलेल्या लोकांना झालेल्या रेटारेटीत जखमी झाले. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन हुल्लडबाजांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.