Pune International Film Festival

Pune International Film Festival: पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) हा भारतामधील एक महत्वाचा चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी पुण्यात या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. जब्बार पटेल हे महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक आहेत. चित्रपटप्रेमी आतुरतेने या चित्रपट महोत्सवाची वाट पाहत असतात. आता या महोत्सवाबाबत एक अपडेट समोर आले आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या 23 व्या आवृत्तीचे वेळापत्रक बदलले आहे. हा महोत्सव आता 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यापूर्वी 16 ते 23 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव आयोजित केला जाणार होता.

वेळापत्रक बदलल्याची माहिती पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पिफमध्ये यावर्षी 81 देशातील 150 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत, असेही पटेल म्हणाले.

या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाची थीम राज कपूर यांची शंभरवी जयंती आहे. महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 15 जानेवारीपासून महोत्सवाच्या अधिकृत वेबसाइट www.piffindia.com वर सुरू होईल आणि थिएटरमध्ये स्पॉट नोंदणी प्रक्रिया 3 फेब्रुवारीपासून सुरू होईल. संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क प्रत्येकासाठी फक्त 800 रुपये आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट निवडण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय ज्युरी 14 अंतिम चित्रपटांचा निर्णय घेईल, ज्यांना महोत्सवाच्या समारोप समारंभात प्रतिष्ठित 'महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार', 10 लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. (हेही वाचा: SANGEET MANAPMAAN Trailer: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाचा ट्रेलर लाँच, सुबोध भावेची मुख्य भूमिका)

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक-

दरम्यान, 2006 पासून महाराष्ट्र शासनाने महोत्सवात मराठी स्पर्धा विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाला पुरस्कार देण्यास सुरुवात केली. विजेते ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रतिस्पर्धी मराठी चित्रपट पाहते. 5 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रप ‘संत तुकाराम’ या मराठी चित्रपटाच्या नावावरून हा पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी कलाकारांना पिफ विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात येतात.