प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

जगातील सर्वात आवडते पेय आणि फास्ट फूडमध्ये कोक (Coke) व हॉट डॉगचा (Hot Dog) समावेश होतो. कोणताही विचार न करता मोठ्या प्रमाणात याचे सेवन केले जाते. जर तुम्हीही कोक आणि हॉट डॉग सारख्या फास्ट फूडचे शौकीन असाल, तर सावध व्हा. नुकतेच समोर आलेले एक नवीन संशोधन तुम्हाला ते खाण्यापूर्वी पुन्हा विचार करायला भाग पाडेल. मिशिगन युनिव्हर्सिटीने केलेल्या एका नवीन अभ्यासात अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे शोधले आहे. तुमचे काही आवडते पदार्थ फक्त तुमच्या कॅलरीजच वाढवत नाहीत तर, ते तुमचे आयुर्मानही कमी करत आहेत.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे कमी होऊ शकते आयुर्मान-

अभ्यासानुसार, काही अति-प्रक्रिया केलेले पदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात. उदाहरणार्थ, एक हॉट डॉग तुमच्या आयुष्यातील 36 मिनिटे कमी करू शकतो, तर कोक तुमच्या आयुष्यातील 12 मिनिटे कमी करू शकतो. तर चीजबर्गर 9 मिनिटे कमी करू शकतो. संशोधनात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, विशिष्ट प्रकारचे मासे खाल्ल्याने तुमचे आयुष्य 28 मिनिटे वाढू शकते. हा एक निरोगी पर्याय उपलब्ध आहे.

आहारात बदल महत्वाचा-

या अभ्यासाचे प्रमुख डॉ. ऑलिव्हियर जॉलिएट यांनी उत्तम आरोग्यासाठी आहारात बदल करण्याच्या महत्त्वावर भर दिला. मानवी आरोग्य सुधारण्यासाठी आहारातील बदल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या आहारात विशिष्ट प्रकारच्या माशांचा समावेश करून तुम्ही आयुर्मान वाढवू शकता, असेही ते म्हणाले. किंबहुना, पूर्वीच्या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, चेडर आणि ब्री सारखे चीज खाल्ल्याने केवळ आयुर्मानच वाढू शकत नाही, तर यकृताचा कर्करोग टाळण्यासही मदत होते. (हेही वाचा: Cancer Risk: रोज चहा आणि कॉफी प्यायल्याने डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका होतो कमी; संशोधनात खुलासा)

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे धोके-

आरोग्याच्या जोखमींबद्दल बोलताना, या वर्षी ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) ने एका अहवालात म्हटले आहे की, जर तुम्ही जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाल्ले तर हृदयविकार, मानसिक समस्या आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीय वाढू शकतो. यामुळे निद्रानाश, नैराश्य, दमा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या देखील होऊ शकतात. एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी डॉक्टर जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्याची शिफारस करतात.