जगात कर्करोगाचा (Cancer) धोका झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. कर्करोगावरील औषध बनवण्याचे संशोधनही सातत्याने सुरू आहे, मात्र त्यात अजूनही अपेक्षित यश मिळाले नाही. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये चहा-कॉफी (Tea and Coffee) प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो असे म्हटले आहे. कॅन्सर मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, दररोज तीन-चार कप कॉफी पिल्याने डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका 17% कमी होतो, तर एक कप चहा प्यायल्याने धोका 9% कमी होतो.
संशोधनात असे दिसून आले आहे की, चहा आणि कॉफीमधील कॅफिन सारख्या बायोएक्टिव्ह घटकांमध्ये दाहक-विरोधी अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. नुकत्याच झालेल्या या संशोधनात असे दिसून आले आहे की, मर्यादित प्रमाणात कॉफी प्यायल्याने निरोगी आयुष्य जगता येते.
अमेरिकेतील उटाह विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये काम करणाऱ्या या अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका युआन-चिन एमी ली यांनी सांगितले की, चहा-कॉफी पिणे आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यावर यापूर्वीही संशोधन झाले आहे, परंतु हा अभ्यासामध्ये मुख्यत्वे डोके आणि मानेच्या कर्करोगावर होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. या अभ्यासात, संशोधकांनी डोके आणि मान कर्करोग असलेल्या 9,550 रुग्ण आणि कर्करोग नसलेल्या 15,800 रुग्णांचा समावेश असलेल्या 14 अभ्यासांमधील डेटाचे विश्लेषण केले.
जे लोक रोज चार कप कॅफिनयुक्त कॉफी पितात त्यांना कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका 17% कमी असल्याचे आढळून आले. यासोबतच तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही 30 टक्क्यांनी कमी झाला आहे आणि घशाच्या कर्करोगाचा धोका 22 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय तीन ते चार कप कॅफिनयुक्त कॉफी प्यायल्याने हायपोफॅरेंजियल कॅन्सरचा धोका 41% कमी होतो. दुसरीकडे, डिकॅफिनेटेड कॉफी प्यायल्याने 'ओरल कॅव्हिटी कॅन्सर'चा धोका 25% कमी होतो. (हेही वाचा: Drinking Soda Raises Heart Attack: सावधान! सोडा प्यायल्याने वाढतो हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका; नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा)
अभ्यासानुसार, एक कप चहा प्यायल्याने डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका 9% आणि हायपोफॅरिन्क्सचा धोका 27% कमी होतो. मात्र, दिवसातून एक कपपेक्षा जास्त चहा प्यायल्याने स्वरयंत्राचा कर्करोग होण्याचा धोका 38% वाढतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांनी ज्या अभ्यासाचे विश्लेषण केले ते मुख्यतः उत्तर अमेरिका आणि युरोपमधील होते, त्यामुळे इतर देशांवर त्याचा परिणाम वेगळा असू शकतो.