Makar Sankranti 2024: मुंबईमध्ये 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान हानिकारक मांजाच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई
Makar Sankranti 2024 (संग्रहित संपादित प्रतिमा)

Ban on Manja: यंदा, नवीन वर्ष 2024 मध्ये वर्षातील पहिला सण मकर संक्रांती (Makar Sankranti 2024) 15 जानेवारी (सोमवार) साजरा केला जाणार आहे. संक्रांतीला देशभरात पतंग (Kite) उडवण्याचीही परंपरा आहे. परंतु या पतंगांच्या मांजामुळे (Manja) होणारे अपघात पाहता, मुंबई पोलिसांनी 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हानिकारक मांजाच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आदेश जारी केला आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात.

पतंग उडवण्याच्या उत्सवादरम्यान नायलॉन किंवा प्लॅस्टिक मांजाच्या वापरामुळे होणारी दुखापत आणि मृत्यू टाळणे हा या आदेशाचा उद्देश आहे. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विद्युत पुरवठा कंपन्यांनी या उत्सवासाठी अजूनतरी कोणतेही सुरक्षा निर्देश जारी केलेले नाहीत. पोलिसांच्या बंदीनंतरही काही लोक निषिद्ध मांजा वापर करत असल्याचे निदर्शनास आहे आहे.

मकर संक्रांतीच्या सणादरम्यान जखमी पक्ष्यांना मदत करणारे तज्ञ लोकांना सुरक्षिततेच्या उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देतात. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे अॅनिमल वेल्फेअर प्रतिनिधी मितेश जैन म्हणाले, ‘वर्षभर मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात, एकट्या मुंबईत संक्रांतीच्या वेळेस दोन दिवसांत सुमारे 1,500 ते 2,000 पक्षी जखमी होतात. मी पालकांना त्यांच्या मुलांना पतंग उडवण्याशी संबंधित धोक्यांचे शिक्षण देण्याचे आवाहन करतो.’

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा प्लास्टिक आणि नायलॉनचा असतो. काचेचे छोटे तुकडे, धातूचे तुकडे आणि विशिष्ट रसायने मिसळून हा मांजा तीक्ष्ण केला जातो. हा धारदार मांजा इतर पतंगांना सहज कापतो, पण तो धोकादायक आहे. त्यात अडकल्यास पक्षी जखमी होऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. या मांजामुळे दुचाकीस्वार आणि लोकही जखमी होऊ शकतात. तसेच, यामुळे विजेच्या तारांना स्पर्श झाल्यास शॉर्ट सर्किट आणि अपघात होऊ शकतात. या धोक्यांमुळे आता अशा प्रकारचा मांजा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा: PM Modi Inaugurate Atal Setu: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं देशातील सर्वात लांब पुल 'अटल सेतू'चे उद्घाटन; Watch Video)

तज्ञ म्हणतात, पतंग उडवण्याच्या उत्सवादरम्यान, बरेच लोक विजेच्या तारांजवळ पतंग उडवतात. कधीकधी, पतंग या लाईन्सवर अडकतात. त्यांना काढण्याचा प्रयत्न करणे धोकादायक असू शकते कारण यामुळे विजेचा झटका बसू शकतो किंवा वीज खंडित होऊ शकते. त्यामुळे, विजेच्या तारांपासून दूर सुरक्षित ठिकाणी पतंग उडवणे आवश्यक आहे.