पुण्यावर झालेले आघात (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Pune : ‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तुळशीबागेपासून ते हिंजवडीपर्यंत मृत्युंजयापासून के.पी.पर्यंत पुण्यातील प्रत्येक भागाची स्वतःची खासियत आहे. कला, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, लाइफस्टाइल या सर्वांच्याच बाबतील पुण्याने भारताच्या नकाशावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तर पुण्यात मेट्रो धावणार आहे म्हणे ! मात्र काही वर्षांपूर्वी पुणे असे नव्हते. काही समजायच्या आतच अल्लड पुणे क्षणार्धात पौढ झाले. आज जितके कठीण, कणखर, स्वावलंबी पुणे आपणाला दिसत आहे त्याच्यामागे पुण्याची वेदना दडली आहे. या जखमा अजूनही आहेत कारण झालेले आघातही तितकेच मोठे होते. पानशेत धरण फुटले, खडकवासलाचे पाणी शहरात शिरले, या घटनेच्या आठवणी आजही पुणेकरांच्या मनात ताज्या आहेत. असे अनेक आघात पचवून आज पुन्हा एकदा पुणे महाराष्ट्राच्या शिरपेचात मनाचा तुरा बनून मिरवत आहे. चला तर पाहूया काय होते हे आघात.

पानशेत धरण फुटले (Panshet Dam) - 12 जुलै 1961 ची भयानक काळरात्र. जणू आकाश फुटून पुणे आणि परिसरावर मुसळासारखे कोसळत होते. त्या रात्री कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते की, पुण्यावर आणि पुण्यातील 70 हजार कुटुंबांवर ही भयानक काळरात्र येऊन कोसळणार आहे. पानशेत भरले होते, रात्री मातीची पोती टाकून कसे तरी तग धरलेल्या धरणाचा पहाटे बांध फुटला आणि शहरात पाणीच पाणी झाले. क्षणार्धात बंड गार्डनचा पूल सोडला तर बाकी सगळे पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुण्याचा संपर्कच तुटला. पुण्यात एक महिना, वीस दिवस वीजपुरवठा नव्हता अणि किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. शेकडो घरे वाहून गेली होती. त्यामुळे नवीन पुणे वसवण्याची गरज होती. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पहिला निर्णय घेतला की, पुण्यालगत असलेल्या जागा ताबडतोब पूरग्रस्तांना द्याव्यात. आज बहरलेले कोथरूड, सहकारनगर आणि बाणेरपर्यंत जी वस्ती दिसते आहे, त्या जागांचे वाटप 1962 पर्यंत पूर्ण झाले होते. पेशवेकालीन पुणे नष्ट होऊन, आधुनिक पुण्याची निर्मिती पानशेतच्या दुर्दैवी आपत्तीने झाली.

फुटलेले पानशेत धारण

जोशी अभ्यंकर खून प्रकरण - पानशेत पुराप्रमाणे जोशी - अभ्यंकर हत्याकांडाची घटना अशीच अविस्मरणीय ठरली आहे. पुण्याला हादरवून टाकलेल्या या हत्याकांडाला तब्बल चाळीस वर्षे उलटली, पण कुठेही तिचा संदर्भ चर्चेत आला तर आजही जुन्या पिढीतील पुणेकरांच्या अंगावर त्या दिवसांच्या आठवणीने शहारा उभा राहतो. 15 जानेवारी 1976 ला प्रसिद्ध ‘हॉटेल विश्व’चे मालक हेगडे यांच्या मुलाचे अपहरण झाले.  त्यानंतर  आठ महिन्यांनी 31 ऑक्टोबर 1976 ला विजयानगर कॉलनीमध्ये राहणार्‍या अच्युत जोशी, पत्नी उषा, मुलगा आनंद यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला. 1 डिसेंबर 1976 रोजी काशिनाथशास्त्री अभ्यंकर यांचा, त्यांच्या पत्नी इंदिराबाई, नातू धनंजय, नात जाई आणि त्यांच्या घरात काम करणार्‍या सखूबाई वाघ या पाच जणांचा खून झाला. या घटनेच्या बातम्यांनंतर पुण्यातील वातावरण एकदम तंग झाले होते. तुळशीबागेसारख्या मध्यवस्तीमध्येही सायंकाळी सातनंतर शुकशुकाट व्हायला लागला होता. या खूनांच्या सत्रानंतर तुळशीबाग, मंडई या परिसरामध्येही रात्री सन्नाटा पसरू लागला होता. शेवटी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना फाशी देण्यात आली होती. (हेही वाचा : ही आहेत भारतातील शापित पर्यटनस्थळे; पुण्यातील हे भुताटकी ठिकाण तर आहे जगप्रसिद्ध)

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट (German Bakery Blast) – संवेदनशील शहर अशी पुण्याची ओळख आहे. पुण्यात कशा सर्व गोष्टी आपल्याच गतीने दौडत असतात, मात्र कोरेगाव पार्क येथे 13 फेब्रुवारी 2010 रोजी सांयकाळी पावणे सातच्या दरम्यान इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने 'आरडीएक्स' चा स्फोट घडवून 17 जणांचा बळी घेतला. तर 45 नागरिकांना जायबंदी केले होते. होय पुण्यातल्या सर्वात श्रीमंत आणि उच्चभ्रू परिसरात चक्क बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणी दहशवादविराधी पथकाने (एटीएस) हिमायत बेगला उदगीर येथून अटक केली होती. त्याच्या घरातून 1200 किलो स्फोटकांचा साठाही जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात एटीएसने एकून 40 जणांवर आरोप निश्चित केले होते. हिमायत बेग हा त्यातील मुख्य आरोपी होता.

जर्मन बेकारी स्फोट

या काही मोठ्या घटना ज्याने पुण्याच्या सामाजिक जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडला. याचसोबत कोरेगाव भीमा आंदोलन, डॉ. नरेंद्र दाभोळकर खून, माथेफिरू बस ड्रायव्हरने 9 लोकांना चिरडणे यांसारख्या  छोट्या मोठ्या अनेक घटना घडल्या आहेत ज्या कशा घडल्या ? का घडल्या ? याची उत्तरे आजही पुणेकर शोधत आहेत.