ही आहेत भारतातील शापित पर्यटनस्थळे; पुण्यातील हे भुताटकी ठिकाण तर आहे जगप्रसिद्ध
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

Haunted Places of India: भारताची संस्कृती, परंपरा, रूढी, चालीरीती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने कितीही प्रगती केली असली तरी, भारतामध्ये अजून एका गोष्टीचे प्रस्थ अजूनही आहे ते म्हणजे जादूटोणा अथवा भुताटकी. आजही कित्येक गावांमध्ये भूताखेतांच्या कथा सांगितल्या जातात. आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जी भुताटकीने पछाडली आहेत. एकेकाळी पर्यटनस्थळे म्हणून मिरवलेली ही ठिकाणे आज शापित क्षेत्रे म्हणून नावारूपास आली आहेत. अनेक लोकांनी या ठिकाणी जाऊन यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाच्याही हाताला यश आले नाही. उलट यातल्या कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चला पाहूया भारतामध्ये अशा कोणत्या लोकप्रिय शापित जागा आहेत.

> भानगड किल्ला (Bhangarh Fort) : भारतातील शापित अथवा भुताटकी (haunted) असलेल्या पर्यटनस्थळांमध्ये अग्रस्थानी आहे राजस्थानमधील भानगड किल्ला. ही जागा फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील ‘हॉंन्टेड’ जागेपैकी एक आहे. 17 व्या शतकात भगवंत दास यांनी हा किल्ला आपल्या मुलासाठी बांधला. राजाच्या राजाकुमारीचे भूत या जागेत वस्त्यव्य करत आहे असे सांगितले जाते. या जागेत भुताटकी असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत, यामुळे सरकारने दिवस मावळल्यावर या किल्ल्यात कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

भानगड किल्ला

> दमास बीच (Damas Beach) – गुजरातच्या सूरतपासून 20 किलोमीटर अंतरावर दमास किंवा डुमस बीच आहे. हा बीच सर्वात सुंदर बीचपैकी एक मानला जातो.  मात्र या जागेचा वापर आधी अंतिम संस्कार करण्यासाठी केला जायचा. यामुळे ही जागा अशुभ मानली जाते. या बीचला लव्हर्सचे फेव्हरेट बीच म्हटले जाते. येथे दिवसभर कपल्स येत असतात, यासोबतच पर्यटकही येतात. पण रात्री येथे कोणीही भेट देत नाही. इथे भुताटकी असल्याने या बीचवरील रेतीदेखील काळी आहे.

दमास बीच

> शनिवारवाडा (Shaniwar Wada) – पुण्याची शान म्हणून शनिवारवाड्याचे नाव घेतले जाते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या वास्तूची निर्मिती केली. या वास्तुत नानासाहेब पेशव्यांना गारद्यांनी जीवे मारले, यांचा आत्मा आजही या वास्तुत आहे असे म्हटले जाते. आजही शनिवारवाड्यात रात्री ‘काका मला वाचवा’ अशी किंकाळी अनेकांनी ऐकली आहे. त्यामुळे संध्याकाळी या वाड्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

शनिवारवाडा

> डाउ हिल (Dow Hill) - दार्जिलिंग येथील डाउ हिल नैसर्गिकरित्या अत्यंत सुंदर आहे. मात्र ही जागाही हॉंन्टेड प्लेस म्हणून ओळखली जाते. स्थानिक मान्यतेनुसार येथील जंगलात शीर (डोके) नसलेला एक व्यक्ती फिरतो. रात्रीच्या वेळी डाउ हिल जंगलात जाणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे मानले जाते. यामुळे येथे फिरायला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका.

डाउ हिल

> पोहरी किल्ला (Pohri Fort) - मध्यप्रदेशातील पोहरी गावात 2100 वर्षांपूर्वीचा वीर खंडेराव यांचा एक किल्ला आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या किल्ल्यातून रात्री घुंगरांचा आवाज येतो. असे सांगितले जाते की, रात्रीच्या वेळी किल्ल्या खंडेरावांची सभा भरते आणि यामध्ये नर्तकींचे नृत्य होते. यामुळे रात्र झाल्यानंतर लोक या किल्ल्याजवळ येत नाहीत.

पोहरी किल्ला