Maharashtra Politics In Future: 'हे' तरुण नेते भविष्यात करु शकतील महाराष्ट्राचे नेतृत्व
Young Political Leaders In Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राच्या राजकारणात एक तरुण फळी नव्याने उदय्यास येऊ पाहात आहे. यात अपेक्षेप्रमाणे राजकीय घराण्यांतील मंडळीचाच समावेश मोठ्या प्रमाणावर असला तरी काही घराणी संसदीय राजकारणात प्रथमच उतरत आहेत. दुसऱ्या बाजूला राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही काही तरुण राजकारणात मोठ्या धडाडीने येऊ पाहात आहेत. यातीलच काही तरुण नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करु शकतील, असे दिसते. यात शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar), काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांच्यासारख्या मंडळींचा समावेश आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)

Aditya Thackeray (Photo Credits- Facebook)

आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आजवर ठाकरे कुटुंबीयांनी निवडणूक लढवली नव्हती. परंतू विधानसभा निवडणूक 2019 मध्ये आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि ते विधानपरिषदेवर आमदार झाले. आदित्य ठाकरे यांच्याकडे सध्या राज्याचे राजशिष्टाचार, पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालय आहे. आदित्य ठाकरे यांचे राजकारणातील वयआणि त्यांच्यावरील जबाबदारी पाहता भविष्यात त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. परंतू, त्यांना आपली शहरी ही प्रतिमा बदलून बाहेर पडण्याची आणि आपले कार्यक्षेत्र अधिक वाढविण्याची आवश्यकता आहे. (हेही वाचा, International Women's Day 2019: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित आणि प्रभावी महिला)

रोहित पवार ( Rohit Pawar)

Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

रोहित पवार हे शरद पवार यांच्या बंधूंच्या मुलाचे चिरंजीव. अर्थातच नातू. रोहित पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. जामखेड येथून त्यांनी विधानसभा निवडणूक 2019 लढवली आणि त्यावेळी मंत्री पदावर असलेल्या भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार यांच्याकडे सध्या कोणतेच मंत्रीपद नाही. परंतू, रोहित पवार यांची राजकीय समज, विषयांची जाण, विविध विषयांवर सोशल मीडियावर व्यक्त केलेली मते पाहता विविध विषयांतील आवाका ते सतत वाढवत असलेले दिसते. शक्यतो आतापर्यत कोणत्याच वादात ते कधीच सापडले नाहीत. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीचा तरुण चेहरा म्हणून रोहित पवार यांचे नाव पुढे येऊ शकते. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्याशी असलेला अधिकचा सलोखा त्यांना भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी संधी देऊ शकतो. (हेही वाचा, Maharashtra Congress State Presiden: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीकडे पाहिजेत हे गुण)

विश्वजित कदम (Vishwajeet Kadam)

Vishwajeet Patangrao Kadam | (Photo credit : facebook)

विश्वजित कदम हे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे सुपुत्र. विश्वजित कदम हे उच्चशिक्षित आहेत. भारती विद्यापीठ यासारख्या दणकट संस्थेचा कारभार त्यांच्याकडे आहे. सध्या ते त्यांच्या भिलवडी वांगी मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत आहेत. या आधी ते युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. काँग्रेस पक्षात सहजासहजी काही मिळत नसते आणि प्रदीर्घ काळ वाट पाहण्याची तयारी असावी लागते. असे असले तरी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आणि विजयाची निश्चित असलेला उमेदवार, तरुण चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू ठरु शकतात.

आदिती तटकरे

Aditi Tatkare (Photo Credits: Twitter)

आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील आमदार आहेत. त्यांचेही वय पाहता भविष्यात त्यांना राजकीय संधी मिळू शकते. शिवाय सुनिल तटकरे यांच्यासारख्या नेत्याचा घरातून असलेला पाठिंबा आणि जिल्ह्यातील वलय पाहता त्यांना संधी मिळू शकते. परंतू याबाबत येणारा काळच सांगू शकतो.

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील,

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्यासारखी काही नावे घेता येतील परंतू त्यांना अधिक मेहनत करावी लागेल. दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेवर अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर यांच्यासारखी काही नावे आहेत. अमोल मिटकरी यांची सामाजिक जाण चांगली आहे. विविध विषयांवरचा त्यांचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नजिकच्या काळात त्यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपवू शकतो. गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली आहे खरी. परंतू, त्यांना पक्षात आणि समाजात नेतृत्व ऋजविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. मुळात त्यांन आपल्या विधानांकडे लक्ष ठेवावे लागेल.