International Women's Day 2019: राज्याच्या आणि एकूण देशाच्याही राजकारणात महिलांचे प्रमाण किती ? असा विचार केला तर, पुरूषांच्या तुलनेत ते प्रचंड कमी असल्याचे जाणवते. राज्याच्या राजकारणात तर त्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. महाराष्ट्र स्थापनेनंतर राजकारणाचा दाखला पाहता मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रतिभा पाटील, शालीनीताई पाटील यांच्या पलिकडे आपल्याला फार काही मजल मारता येत नाही. पण, असे असले तरी गेल्या काही दशकामध्ये राज्याच्या राजकारणातही काही महिला महत्त्वाचे स्थान पटकावताना दिसत आहेत. वरच्या स्तरावर (विधानस सभा, विधानपरिषद) हे प्रमाण कमी असले तरी, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपांचायती आणि महापालिका, नगरपालीकांमध्ये महिला नेतृत्वाचे प्रमाण कमालीचे वाढत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्या महिलांविषयी, ज्या निभावत आहेत राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान....

सुप्रिया सुळे (खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या)

राज्याच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांनी मोठे स्थान निर्माण केले आहे.

सुप्रिया सुळे, या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निभावणाऱ्या शरद पवार यांच्या कन्या. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पाऊल ठेवले तेव्हा 'एका बढ्या नेत्याची कन्या' असा शिक्का त्यांच्यावर बसला. सुरुवातीचा बराच काळ हा शिक्का त्यांच्यावर कायम राहिला. काही काळ जाताच सुप्रिया सुळेंनी प्रत्यक्ष राजकारणात आपली झलक दाखवली. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणावर बरेच प्रभुत्व मिळवले आहे. संसदेत त्यांची भाषणे ऐकण्यासारखी असतात. त्या नेहमी अभ्यासपूर्ण बोलतात. महिला बचत गट आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातही आपले नेतृत्व रूजवले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व, सडेतोड आणि स्पष्ट भूमिका, संघर्ष करण्याची तयारी आणि शेती ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करण्याची वृत्ती हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्याकेड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भविष्यातील महत्त्वाच्या नेत्या तसेच, महाराष्ट्राच्या भविष्यातील पहिल्या मुख्यमंत्री म्हणूनही पाहिले जाते. महत्त्वाचे म्हणजे आजवर त्या कोणत्याही वादात सापडल्या नाहीत.

निलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्ता

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निलम गोऱ्हे

टीव्हीवरील कोणतीही राजकीय घ्या. त्यात निलम गोऱ्हे शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसतील. गेली अनेक वर्षे त्या शिवसेनेच्या प्रवक्ता राहिल्या आहेत. पण, असे असले तरी केवळ एका राजकीय पक्षाच्या प्रवक्ता हा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. महलांच्या प्रश्नावर त्या नेहमीच आघाडीवर असतात. तसेच, हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकारचा संघर्ष करण्याची आणि आवाज उठविण्याची त्यांची तयारी असते. मग ती रस्त्यावरची लढाई असो, किंवा विधीमंडळात केली जाणारी भाषणे असोत. निलम गोऱ्हे यांचे आणखी एक वैशिष्ट असे की, शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षात काम करुनही त्या पक्षाची भूमिका अत्यंत संयतपणे आणि तितक्याच प्रभावीपणे मांडतात. राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांपैकी अभ्यूस व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री (कॅबिनेट)

पंकजा मुंडे यांनी  भाजप नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली राजकीय कारकिर्द सुरू केली.

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुढे. वडिलांच्या छत्रछायेखाली पंकजा मुंडेंनी सुरू केलेला राजकारणाचा प्रवास आजही सुरूच आहे. भारतीय युवा मोर्चा या भाजपच्या तरूणांच्या संघटनेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरूवात झाली. पुढे आमदार आणि आज विद्यमान राज्यसरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण मंत्रालयाचा कारभार, असा त्यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. वडीलांप्रमाणेच उपस्थितांच्या भावनेला हात घालून भाषण करण्याची कला त्यांना अवगत आहे. मात्र, त्यांनी एकदा भावनेच्या भरात 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मिच आहे', असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांनी राजकारणात बऱ्यापैकी जम बसवला आहे. मात्र, त्यांची कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यातील परळीमधून त्यांचेच चुलतबंधू राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना सतत आव्हान मिळते. त्यामुळे म्हटले तर राजकीय म्हटले तर, कौटुंबिक असा असलेला हा संघर्ष. या संघर्षाचे आव्हान त्या कसे पेलतात यावर त्यांचे भविष्यातील राजकारण आकार घेईल हे नक्की.

प्रणिती शिंदे, कॉंग्रेस आमदार

वय आणि भाषणशैली वारसा या गोष्टी पाहता प्रणिती शिंदे राजकारणात मोठी मजल नक्कीच मारता येऊ शकते.

प्रणिती शिंदे यांनासुद्धा राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला. माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या त्या कन्या. त्या सध्या सोलापूरमधून काँग्रेसच्या आमदार आहेत. महाराष्ट्रातील तरुण आणि सौंदर्यवान महिला राजकारणी अशी त्यांची ओळख. त्यांचे वय आणि भाषणशैली वारसा या गोष्टी पाहता त्यांना राजकारणात मोठी मजल नक्कीच मारता येऊ शकते. पण, त्यांच्या नेतृत्वाचा अद्याप म्हणावा तसा कस लागला नाही. तसेच, त्यांनीही राज्याच्या राजकारणात आपले नेतृत्व ठसविण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचे राजकारणातील भविष्य कसे असेल याबाबत इतक्यात मत नोंदवने धाडसाचे ठरेल.

नवनीत कौर-राणा

नवनीत कौर-राणा या एकेकाळच्या अभिनेत्री. राजकारणाचा तसा त्यांना फारसा अनुभव नाही. पण, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावरून नशीब अजमावले. पण, त्यांना यश आले नाही. त्या पराभूत झाल्या. नवनीत कौर यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला तेलगु चित्रपटातून सुरवात झाली. त्या मुळच्या पंजाबी आहेत. राज्याच्या राजकारणातील एक वलयांकीत चेहरा म्हणून त्या नेहमीच चर्चेत असतात.

पुनम महाजन, भाजप खासदार

पुनम महाजन यांनाही प्रचंड मोठा राजकीय वारसा आहे. राष्ट्रीय पातळीवरचे भाजपचे तगडे नेते अशी ओळख असेले दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या. बंधू प्रविण महाजन यांनी प्रमोद यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर महाजन हे नाव काही काळ राज्य आणि देशाच्या राजकारणातून मागे पडले. पण, प्रमोद महाजन यांचे म्हेवणे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर त्या राजकारणात आल्या. सुरुवातीच्या काळात राजकारणाला नवख्या असलेल्या पुनम आता राजकारणात चांगल्याच सरावल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांचा पराभव केला.

प्रिया दत्त, कॉंग्रेस नेत्या आणि माजी खासदार

प्रिया दत्त केवळ राजकारणी म्हणूनच नव्हे तर, इतर अर्थांनीही वलयांकीत नाव. एकेकाळचे लोकप्रिय अभिनेते आणि काँग्रेसचे नेते दिवंगत खा. सुनील दत्त यांच्या त्या कन्या. तर, अत्यंत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असलेला अभिनेता संजय दत्त यांच्या त्या बहिण आहेत. त्यामुळे राज्य आणि देशात दत्त कुटुंबिय नेहमीच चर्चेत आणि वलयांकीत राहिले आहे. सुनिल दत्त यांच्या निधनानंतर त्या राजकारणात आल्या. २००५ मध्ये त्यांनी उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवली आणि त्या निवडूनही आल्या. २००९ मध्येही त्या विजयी झाल्या. मात्र, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पुनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.