![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/06/Examinations_AC.jpg?width=380&height=214)
बोर्ड परीक्षेमध्ये कॉपी करण्यास आणि ती मित्रास पुरविण्यास मज्जाव केल्याने चक्क शिक्षकासच धमकावण्याचा धक्कादायक प्रकार आहे. कालपासून (11 फेब्रुवारी) सुरु झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (Maharashtra HSC Class 12 2025) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेदरम्यान पाथर्डी (Pathardi) येथे हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे, कॉपीस विरोध करणाऱ्या शिक्षकास विद्यार्थ्यांनी धमकावले असून त्यातील एकाने तर चक्क चाकूचा धाक दाखवला. इयत्ता बारावीची बोर्ड परीक्षा म्हटले की, कॉपी आणि गोंधळ हे समिकरण पाठीमागील अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होते. मात्र, अलिकडे महसूल, पोलिस आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने संयुक्तरित्या उपक्रम राबवला असल्याने कॉपी बहाद्दरांना चाप बसला आहे. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थी, पालक आणि तत्सम समाजकंटकाकडून चक्क व्यवस्थेलाच आव्हान देण्याचे प्रकार घडत आहेत.
कॉपीमुक्त परिक्षांसाठी कंबर कसली
कॉपी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने यंदा कठोर पावले उचलली आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण आणि महसूल विभागावर आहे. त्यामुळे पाथर्डी येथील या विभागांनी कॉपीमुक्त परिक्षांसाठी कंबर कसली आहे. अशा स्थितीत विद्यार्थी नसताना शाळा काढून ठेवलेल्या अनेक संस्था हमखास पासचे आमिश दाखवतात. त्यामुळे अशा संस्थांच्या अनेक शाळांतून आलेले विद्यार्थ्याचे पीक पाथर्डी येथील परीक्षा केंद्रांवर दाखल झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पास करायचे तर काही सोपा आणि अवैध मार्ग निवडण्यास पर्याय नाही. परिणामी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यासाठी संबंधीत शाळा, मित्र परिवार आणि पालक यांची तगमग होत आहे. परंतू, शिक्षण आणि महसूल विभागाने राबवलेल्या कडक धोरणांमुळे परीक्षा काळात कॉपी आणि इतर गैरप्रकारांना चाप बसतो आहे. सहाजिक कॉपी पुरवणाऱ्यांची आणि ती न मिळाल्याने संबंधितांची घालमेल होऊ लागली आहे. त्यातूनच काही विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला चाकूचा धाक दाखविण्याचा आणि धमकावण्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचे समजते.
कॉपी रोखण्यासाठी चोख व्यवस्था
- दरम्यान, पाथर्डी तालुक्यात एकूण 12 परीक्षा केंद्रे आहेत त्या केंद्रांवर कॉपी रोखण्यासाठी चोख यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
- कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाने शिक्षकांची विद्यालये आणि परीक्षा केंद्रे बदलली आहेत. ज्यामध्ये एका विद्यालयातील शिक्षकांना इतर परीक्षा केंद्रांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
- महसूल प्रशासनाने तर याही पुढचे पाऊल टाकले आहे. सुपरवायझर म्हणजेच निरिक्षक असलेल्या प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलवर लिंक टाकून तो सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षागृहात नेमके काय सुरु आहे ते स्पष्ट दिसत आहे.
- लिंकच्या माध्यमातून वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांवरही वरिष्ठांचा वचक राहत आहे.
ड्रोनमुळे दाणादाण
उपाययोजना कडक केल्या असतानाच शिक्षण विभागाने यांदा प्रथमच कडक नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे कॉपी पुरविण्यासाठी परीक्षा केंद्राच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांची पळापळ होत आहे. ड्रोन डोक्यावर आले की, अनेक जण पळतान दिसत होते. शिवाय, परिक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा कार्यन्वीत करण्यात आल्याने कॉपीबहाद्दरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.