महाराष्ट्रात यंदाच्या ऑगस्टमध्ये सरासरीच्या फक्त 40 टक्के पावसाची नोंद झाली, त्यामुळे आगामी दुष्काळाची (Maharashtra Drought) चिंता निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 11 जिल्ह्यांमध्ये या पावसाळ्यात जून ते ऑगस्टच्या अखेरीस 32 ते 44 टक्के कमी पाऊस झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुकानिहाय सर्वसमावेशक आराखड्यासह संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले की, ‘ऑगस्टमध्ये पावसाचा असामान्य लांबलचक ब्रेक हा चिंतेचा विषय आहे. सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागतील आणि संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाला निर्देश जारी करण्यात आले आहेत.’
जून ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात 658.7 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यंदा मान्सून पावसल विलंब झाला. त्यानंतर जूनच्या पंधरवड्यात मान्सून राज्याच्या सर्व भागात पोहोचला. जून आणि जुलैमध्ये पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आणि विदर्भ, कोकण आणि उत्तर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. मात्र, ऑगस्टमधील खराब पावसाने मोठा झटका दिला आहे.
ऑगस्टमध्ये सरासरी पावसाचा अंदाज 221.4 मिमी होता. मात्र राज्यात 12 दिवसात केवळ 88 मिमी पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, नंदुरबार, परभणी, जालना, अकोला, यवतमाळ या भागात एक-दोन दिवसांचा अल्पकाळ पाऊस झाला. ऑगस्टमध्ये अतिशय कमी पाऊस झाल्याने, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र विभागातील काही भागांमध्ये दुष्काळी स्थितीची चिन्हे दर्शविली आहेत. (हेही वाचा: Mumbai Dam Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली; पाहा धरणातील पाणीसाठा)
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, ‘संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने, दुष्काळी जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाड्यातील पाण्याची परिस्थिती ही गंभीर चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनासह सर्व नोडल विभागांना यासाठी योजना तयार करण्यास सांगितले जात आहे. पिण्याचे पुरेसे पाणी आणि जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे.’
मान्सून आणखी दोन महिने लांबल्यास रब्बी पेरणीच्या हंगामाला मदत होईल. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये खरीप पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रामध्ये 2.72 लाख हेक्टर घट झाली आहे. कडधान्याखालील क्षेत्र 15 टक्क्यांनी घटले असून तेलबियांचे क्षेत्र दोन टक्क्यांनी वाढले आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, ‘गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. यंदा कमी पावसामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे तसेच जयंत पाटील यांनी केली आहे.