Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान पार पडत आहे. निवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. विविध मतदारसंघात विविध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत. ही उमेदवारी देताना मतदारसंघातील जात, धर्म, संस्कृती, सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांची पार्श्वभूमी असे सर्व मुद्दे विचारात घेतले आहेत. मालेगाव विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र दिसते. काँग्रेस पक्षाने मालेगाव (Malegaon Central Assembly Constituency) येथून आसिफ शेख (Shaikh Asif) यांना मैदानात उतरवले आहे. तर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाकडून मौलाना मुफ्ती इस्माईल हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध एमआयएमआयएम पक्षात सामना होईल असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार आसिफ शेख यांच्यासोब लेटेस्टलीने साधलेला हा संवाद.
लेटेस्टली: आपण पाच वर्षे आमदार राहिला आहात! आपल्या कार्यकाळात झालेल्या पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकाल?
शेख आसिफ: नक्कीच, काँग्रेस आमदार या नात्याने मालेगाव उड्डाणपूल उभारणीसाठी सरकारकडून मंजुरी आणण्यात यशस्वी ठरलो. या उड्डाणपुलाचे काम सध्या सुरु आहे. माझ्या कार्यकाळात एक हिल स्टेशन आणि उर्दू घर उभारण्यात आले. सरकारने आयटीआय कॉलेजसाठी मी केलेली मागणीही मंजूर केली आहे. NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रही चालवले जात आहे.
लेटेस्टली: शिक्षण, आरोग्य, नोकरी अशा विविध मागण्यांसाठी मालेगाव ते मुंबई असा एक मोर्चा मुस्लिम बांधवांनी अलिकडेच काढला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भाजप सरकारने या मागण्या फेटाळल्या. जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्ते आले तर, मुस्लिमांना आरक्षण मिळू शकेल?
शेख आसिफ: जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली तर मुस्लिमांना शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळू शकेल. जर आमचे सरकार आले नाही तर, या मागण्यांसाठी आवाज उठवू सरकारकडे पाठपुरावा करु.
लेटेस्टली: बहुमत नसल्याने आपण मालेगाव नगरपालिकेत शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. राज्यसभेत एनडीएने ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करण्यात यशस्वी ठरले. त्यावेळी काँग्रेसचे खासदार मतदानासाठी सभागृहात अनुपस्थित होते. हे सर्व पाहता काँग्रेस खरोखरच धर्मनिरपेक्ष पक्ष राहिला आहे?
शेख आसिफ: काँग्रेसने ट्रिपल तलाक विधेयकाला विरोध केला आणि त्याविरोधात मतदानही केले. मी असदुद्दीन ओवैसी आणि मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांना विचारु इच्छितो की, एआईएमआईएम तेलंगाना मध्ये तेलंगाना राष्ट्रीय समिति (टीआरएस) चे समर्थन का करत आहे? काँग्रेस ही समाजातील सर्व घटक तसेच अल्पसंख्याक समुदयाच्या हक्कांसाठी लढते, लढत आली आहे यापुढेही लढत राहणार आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 Exclusive Interview: मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मौलाना मुफ्ती इस्माईल AIMIM कडून पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात; जाणून घ्या का सोडला राष्ट्रवादी पक्ष?)
लेटेस्टली: मालेगावमधून जाणारा आगरा महामार्ग खड्डे आणि दुर्दशेमुळे सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरला होत. आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्याल?
शेख आसिफ: 2014 मध्ये मी आमदार म्हणून निवडूण आलो. 2017 मध्ये राज्य सरकारकडून आगरा मार्गासाठी उड्डाणपुल निर्माण करण्यासाठी मंजूरी मिळाली. काम सुरु आहे. ते पूर्ण होण्यासाठी काही काळ नक्कीच लागणार आहे. कामाला विलंब लावणाऱ्या कंत्राटदाराला आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात येत आहे.
लेटेस्टली: मालेगवच्या जनतेला काय संदेश द्याल?
शेख आसिफ: मालेगावला एका विनाशकारी शक्तीपासून वाचविण्यासाठी मी लढत आहे. मालेगावचे नागरिक धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करतात. जर AIMIM पक्ष मुस्लिमबहूल भागात जिंकून आला तर समाजात एक चुकीचा संदेश जाई. एमआयएमआयएम पक्षाच्या विजयामुळे मालेगावला जातीयवादी ओळख देईल. शहरातील आणि मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडावा असे मला अजिबात वाटत नाही. म्हणूनच ध्रुविकरण रोखण्यासाठी जनतेने मला मतदान करावे अशी मी विनंती करेन.