Maharashtra Assembly Elections 2019: मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन... असे खात्रीपूर्वीक सांगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, काही झाले तरी आम्हीच पुन्हा सत्तेत येणार असा दावा करणाऱ्या शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) आणि मित्रपक्षांच्या युतीला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजप आणि महायुतीच्या निवडणूक व्यवस्थापनात बंडखोरांनी अडकाटी घातल्यामुळे तसेच, मागच्या वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का घटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (Congress-NCP) पक्षाच्या आकांक्षा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये जनमत खेचण्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह मनसे (MNS) आणि इतर मित्रपक्षांनी राज्यभर प्रचारदौरे केले. या सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवाराचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. असे असले तरी एकूण चित्र आणि घटलेल्या मतदानाचा टक्का नवे प्रश्न निर्माण करत आहे.
शिवसेना-भाजप महायुतीला बंडखोरांचा फटका?
राजकीय विश्लेषकांनी प्रसारमाध्यमांतून व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 288 जागांपैकी सुमारे 40 जागांवर शिवसेना-भाजप महायुतीला बंडखोरांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. राजकीय विश्लेषकांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार, शेतीचे प्रश्न, दुष्काळ, महापूर, बेरोजगारी यांसह विविध मुद्द्यांवर सरकार (भाजप-शिवसेना) निवडणुक प्रचारात फारसे प्रभावी मुद्दे मांडू शकले नाही. त्यात निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेले पीएमसी बँक आणि आर्थिक मंदी आदी गोष्टीही सरकारविरोधात जनमत एकवटवण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात.
मतदानाची टक्केवारी घटली! फटका कुणाला?
नेहमीच्या तुलनेत या वेळी मतदारांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला. सकाळपासून दुपारपर्यंत मतदारांचा निरुत्साह कायम होता. दुपारपर्यंत चित्र काहीसे बदलले. पण, त्यात विशेष असा काहीच परिणाम पाहायला मिळाला नाही. यातही अधोरेखीत करण्यासारखी बाब म्हणजे शहरी भागांच्या तुनलेत ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवला. त्यामुळे मतदानाची घटलेली टक्केवारीही युती आणि आघाडीच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरणार आहे. (हेही वाचा, एका मताची गोष्ट, एकमतापूर्वी एक मत महत्त्वाचं; निवडणूकीच्या रिंगणात भल्याभल्यांना दणका, दिग्गज पराभूत)
कलम 370 मतदारांना भावणार का?
भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर केंद्रीय नेत्यांच्या भाषणांतून जम्मू-काश्मीर आणि कलम 370 मुद्दा उपस्थित केला. परंतू, हा मुद्दा सर्वसामान्य जनता खास करुन ग्रामीण भागातील मतदारांना किती भावाला यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. विरोधी पक्षनेते आणि सर्वसामान्य मतदार कलम 370 या मुद्द्याचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत थेट संबंध काय असा सवाल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विचारताना दिसत होते.
सभांच्या गर्दीचा फायदा कुणाला?
भाजप-शिवसेना विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपल्या पद्धतीने प्रचार केला. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रचारात बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभांनाही मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, सभांना गर्दी झाली तरी प्रत्यक्ष त्याचा फायदा कोणाला होणार याबाबत उत्सुकता आहे. खास करुन राज ठाकरे यांचा मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कोणाची मते खाणार आणि कोणाला धक्का देणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. चर्चा आहे की, मनसे शिवसेना भाजपची मते खेचू शकते. तर, वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला धक्का देऊ शकते.
या वेळची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली. देवेंद्र फडणवी यांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी देशभक्तीच्या मुद्द्याचा आधार प्रामुख्याने घेतला. तर, दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी नेहरुवाद, शेतकरी, दुष्काळ आदी मुद्द्यांचा आधार घेतला.