Mahalaxmi Saras Exhibition

वांद्रे (पूर्व) येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२३-२४’ (Mahalaxmi Saras Exhibition) ला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. महालक्ष्मी सरसच्या भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉलला मुंबईकर भेट देत असून खरेदीतून विविध कला व कौशल्यांचा आस्वाद घेतल्याचे दिसून येत आहे. महालक्ष्मी सरसच्या फूड कोर्टवर खवय्यांनी गर्दी केलेली दिसून आली. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, खानदेशी मांडे व देशभरातून आलेल्या विविध खाद्य व्यंजनांचा मुंबईकर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

मुंबईसह विविध ठिकाणाहून सहकुटुंब सहपरिवार याठिकाणी भेटीसाठी नागरिक येत आहेत. दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात उज्ज्वला खेडेकर यांच्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन, प्रसिद्ध शाहीर देवानंद माळी यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देत आहेत.

महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचतगटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.

या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बूट,ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी, कार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. (हेही वाचा: Mumbai Dust Pollution: धुळीच्या प्रदूषणाला तोंड देण्यासाठी BMC दररोज धुणार 1,000 किमी रस्ते; इक्बाल सिंग चहल यांचे निर्देश)

सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे.