BMC (File Image)

मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या (Pollution) पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आता बीएमसी प्रमुख इक्बाल सिंग चहल यांनी अधिकाऱ्यांना धूलिकणांचा निपटारा करण्यासाठी दररोज 1,000 किमी रस्ते धुण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या शहरात 600 किमीचे रस्ते धुण्यासाठी 121 टँकर वापरले जात आहेत. त्यामुळे, नागरी अधिकाऱ्यांनी आता 24 प्रशासकीय प्रभागांमध्ये प्रत्येकी 10 अतिरिक्त टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी नागरी मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यासह बीएमसीने 31 डिसेंबर रोजी ‘मेगा डीप क्लीनिंग’ मोहीम देखील जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर बीएमसीने वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी 3 नोव्हेंबरपासून रस्ते धुण्यास सुरुवात केली.

शिंदे यांनी बीएमसीला त्यांच्या 2,050 किमी रस्त्यांपैकी 1,000 किमी रस्ते दररोज धुण्याची सूचना केली होती. मात्र, मर्यादित स्त्रोतांमुळे, बीएमसीला दररोज केवळ 500 ते 600 किमी रस्ते धुणे शक्य झाले. काळाच्या आढावा बैठकीत चहल यांनी शहरातील निम्मे रस्ते धुण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या आणि अतिरिक्त टँकर भाड्याने घेण्याच्या सूचना नागरी अधिकाऱ्यांना दिल्या.

गेटवे ऑफ इंडिया येथून रात्री 9 वाजता मेगा डीप क्लीनिंग ड्राईव्हचा शुभारंभ केला जाईल आणि रविवारी 10 नागरी वॉर्डांमध्ये राबविण्यात येईल. सुमारे 1 हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी त्यांच्या यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवतील. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली की, सखोल सफाईचा हा 'मुंबई पॅटर्न' राज्यातील इतर सर्व शहरांमध्ये लागू केला आहे. त्यामुळे कामाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त टँकर आणि जेट स्प्रे मशीन तैनात करा, असे निर्देश चहल यांनी बैठकीत दिले. (हेही वाचा: Flights Cancelled At Pune Airport: दिल्लीतील दाट धुक्यामुळे हवाई प्रवास प्रभावित; पुणे विमानतळावर 9 उड्डाणे रद्द)

यासह त्यांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्यांच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी नागरी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणार्‍या बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याची आठवण करून दिली. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीनुसार, मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक गुरुवारी 190 हून अधिक होता. बुधवारीही हलके धुरके जाणवले.