लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र; पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
Lonar Crater Lake Water Turns Red (Photo Credits: ANI)

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पाणथळ क्षेत्रांना 'रामसर पाणथळ' (Ramsar Site) म्हणून घोषित केले जाते. आता या यादीमध्ये महाराष्ट्रातील लोणार सरोवराचा (Lonar Crater) देखील समावेश झाला आहे. काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मागील वर्षी भारतातील 10 जागांचा तर महाराष्ट्रातील नाशिक मधील नांदूरमधमेश्वर याचा देखील त्यामध्ये समावेश झाला होता. त्यापाठोपाठ आता लोणारचा समावेश झाला आहे.

मुंबई पासून 500 किमी लांब बुलढाण्यातील लोणार सरोवर हे अनेकांच्या आकर्षणाचा भाग आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक पर्यटक लोणार सरोवर बघण्यासाठी थांबतात. ते पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे स्थळ आहे. उल्कापातामधून लोणारची निर्मिती झाली आहे. पाणथळा जगा नष्ट झाल्यास निसर्गाचा आणि पर्यावरणाचा र्‍हास होणार आहे. असा अभ्यासकांचा दावा आहे. त्यामुळे जगभरातील पाणथळ वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. काही महिन्यांपूर्वी लोणारचं पाणी अचानक गुलाबी झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. NASA ने टिपलं बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या हिरव्या ते गुलाबी रंगातील रूप; जाणून घ्या पाण्याचा रंग बदलण्यामागे काय असू शकतात शक्यता

Aaditya Thackeray Tweet

जगभरात वाढते औद्योगीकरण आणि शहरीकरण पाहता आता दलदलीय क्षेत्रं, पाणथळ क्षेत्र धोक्यामध्ये आली आहेत. पण या पाणथळ जागा सजीवसृष्टींसाठी जपणं हे महत्त्वाचं आहे. त्यांना अभय मिळावं म्हणूनच 'रामसर' अस्तित्त्वामध्ये आली आहे. पाणथळ जागांचे संवर्धन पृथ्वीसाठी बहुमोलाचे आहे त्यामुळे जागतिक स्तरावर त्याच्यादृष्टीने 1974 पासून प्रयत्न सुरू झाले. ईराण मध्ये कॅप्सियन समुद्राच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या रामसर मध्ये पहिली परिषद पार पडली होती. त्यामध्ये जगभरातील 170 देशांनी सहभाग घेत करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. त्यानंतर जगात जैव विविधतेने समृद्ध असलेल्या पाणथळांना रामसर पाणथळ म्हणून समाविष्ट करण्यास सुरूवात झाली.

भारतामधील उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, राजस्थान, ओडिशा, केरळ, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तमिळनाडू, जम्मू कश्मीर येथील 41 जागांचा रामसर पाणथळ क्षेत्रांमध्ये समावेश झालेला आहे.