Flood in Sangli: भाजपची सत्ता असलेल्या दोन राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव; परिणामी सांगली शहरात महापूर
Flood in Sangli: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and Karnataka Chief Minister BS Yeddyurappa | (Photo credit: Archived, edited, and representative images)

Floods in Maharashtra: कोल्हापूर, सांगली आणि नंदुरबार जिल्ह्यातील पऊस थांबला. पण म्हणून काही या ठिकाणची पूरस्थिती कमी झाली असे मुळीच नाही. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आजही पूरस्थिती कायम आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील आलमट्टी (Almatti Dam) धरणातील पाण्याचा विसर्ग न वाढवल्याने सांगली शहर आणि जिल्ह्यात आजही पाणीच पाणी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) प्रणीत बहुमतातील सरकार आहे. असे असतानाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची विनंती धुडकावून लावत आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने पूरग्रस्त परिसरातील नागरिकांच्या अडचणीत वाढ झाल्याची टीका आता होऊ लागली आहे.

गेले दोन ते तीन दिवस सांगली शहरात आणि जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्याने मुक्काम केला आहे. इतका की नागरिकांची दैना दैना उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरग्रस्त ठिकाणांचा हवाई दौरा केला. त्यानंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती केली. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची विनंती केली होती. ज्याला कर्नाटक सरकारने नकार दर्शवला, असे लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. परिणामी आलमट्टीतून विसर्ग न झाल्याने सांगली शहरात साचलेले पुराचे पाणी अद्यापही कायम आहे. प्राप्त माहितीनुसार सांगली शहरातील 65 टक्के भाग पुराच्या पाण्याखाली अडकला आहे. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर, सांगलीत साचलेले पाणी कमी होण्यास मदत होऊ शकते. (हेही वाचा, Floods in Maharashtra: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा; दोन हजारांहून अधिक मालट्रक, अन्य अवजड वाहने अडकली)

प्राप्त माहितीनुसार, आलमट्टी धरणातून शुक्रवारी (9 ऑगस्ट 2019) सकाळी दहाच्या सुमारास ४ लाख ३० हजार ३५२ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात होता. वास्तविक पाहता महाराष्ट्राने तब्बल साडेपाच लाख क्युसेक्स इकत्या पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती केली होती. पण, कर्नाटक सरकारने केवळ साडेचार लाख क्युसेक्स इतक्याच पाण्याचा विसर्ग केला. म्हणजे मूळ मागणीच्या तब्बल दीड लाख क्यूसेक्स इतक्या कमी प्रमाणात. त्यामुळे अद्यापही सांगली पूरग्रस्तच आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट

सांगली शहरातील पूर म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील जलव्यवस्थापणात असलेला संभ्रम स्पष्ट होत आहे. दोन्ही राज्यांमध्ये जलव्यवस्थापणावरुन गेली अनेक वर्षे वाद सुरु आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर बहुतेकदा ही राज्ये परस्परविरोधी भूमिका घेताना दिसतात. भविष्यात त्यात सुधारणा झाली नाही तर, दरवर्षीच पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो.