Kolhapur: पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करत थेट टाळे लावण्याचे आदेश
CM Uddhav Thackeray | (Photo Credit- Facebook)

कोल्हापूर जिल्हा सधन, सुपीक राहण्यामध्ये पंचगंगा नदीचे (Panchganga River) मोठे योगदान आहे. मात्र आता हीच पंचगंगा प्रदूषणाचे केंद्र बनत चालली आहे. इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते जात आहे, यामुळे नदी काळवंडली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या आता आज याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे व त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकाणांवरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.’ (हेही वाचा: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली होणार)

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सहानुभुतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील तथा राज्यातील बऱ्याच नद्या प्रदूषित आहेत. पण पंचगंगेच्या बाबतीत मात्र हे प्रदूषण तीव्र असल्याचे दिसते. त्यामुळे नदीतील मासे मरुन ते पाण्यावर तरंगण्यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यासाठी पाण्यातील नेमके कोणते रासायनिक प्रदूषण, विषारी घटक कारणीभूत ठरले ते निश्चित करुन ते रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. या नदीच्या प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडीट करणे आवश्यक आहे.