कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने 31 मार्च 2020 पासून पुण्यातील (Pune) ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, अनलॉक अंतर्गत राज्यातील बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्याने सुरु झाल्या आहेत. यामुळे पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके आणि संग्रहालये सुरु करण्यात यावी, अशा मागणीं केली जात होती. कारण, या ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. याचपार्श्वभूमवर ऐतिहासिक वास्तू किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता देत असल्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले आहे. मात्र, या सर्वांना कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
कोरोना महामारीमुळे 24 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. परिणामी, देशातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प होत्या. मात्र, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनलॉक अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरेल, अशा लसची अद्याप निर्मिती झाली नाही. यामुळे नागरिकांनी पुढील काही काळापर्यंत मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. हे देखील वाचा- पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी पुण्यातील महाविद्यालयं 11 जानेवारीपासून होणार सुरु
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले होते. राज्यात आज 3 हजार160 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2 हजार 828 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 लाख 50 हजार 189 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 49 हजार 67 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.87% वर पोहचले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.