कृत्रिम पावसाच्या प्रयोगात कर्नाटक राज्याची आघाडी; महाराष्ट्राला सरकारी दफ्तर दिरंगाईचा फटका
Artificial Rain Experiment | Image only representative purpose (Photo credit: File Image)

Artificial Rain Experiment: नैसर्गिक पावसाने दिलेली ओढ आणि घटलेले पर्जन्यमान आदी कारणांमुळे उद्भवणारी दुष्काळ, दुष्काळसदृश्य स्थिती आणि पाणीटंचाई आदी गोष्टींवर मात करण्यासठी महाराष्ट्र (Maharashtra) सरकार राज्यभरात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवणार आहे. हा प्रयोग राबविण्यासाठी राज्य सरकारने योग्य दिवसही शोधला. मात्र, आता ठरलेल्या दिवशी कृत्रिम पावसाचा प्रयोग न होता तो लांबणीवर पडला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक (Karnataka) राज्याने मात्र कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला मात्र सध्यातरी नैसर्गिक पर्जन्यवृष्टीवरच भिस्त ठेवावी लागणार आहे. दरम्यान, राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु होण्यास सरकारची दफ्तर दिरंगाई कारणीभूत असल्याचे समजते.

राज्य सरकारने या आधी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 30 जुलै 2019 रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार होता. मात्र, आता हा प्रयोग 8 ते 9 ऑगस्ट 2019 या दिवशी केला जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यास सुरुवातही झाली आहे. या प्रयोगासाठी आवश्यक असलेलेल विमान कर्नाटकमध्ये पोहोचलेही आहे. महाराष्ट्रात मात्र हे विमान अद्याप पोहोचले नसून, येत्या 2 किंवा तीन ऑगस्टला हे विमान महाराष्ट्रात पोहोचेल अशी माहिती आहे.

दरम्यान, प्रकल्प संचालक विवेकानंद बालापल्ली यांच्या हवाल्याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान 2 ते 3 तारखेला महाराष्ट्रात पोहोचले तरी, त्याची तपासणी होण्यास आणखी अवधी लागणार आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी 8 ते 9 ऑगस्ट हा मुहूर्त उजाडणार आहे. (हेही वाचा, खुशखबर! राज्यात 30 जुलै पर्यंत कृत्रिम पाऊस पडणार, प्रक्रिया झाली पूर्ण: पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर)

महत्त्वाचे म्हणजे, राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यासाठी विमानांचे टेंडर फेब्रुवारी महिन्यातच देणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ते दिलेच नाही. त्याउलट कर्नाटक सरकारने या प्रयोगासाठी आवश्यक विमानासाठी फेब्रुवारी महिन्यातच टेंडर दिले. परिणामी कृत्रिम पावसासाठी आवश्यक विमान कर्नाटकमध्ये दाखल होऊन हा प्रयोग सुरुही झाला.