खुशखबर! राज्यात 30 जुलै पर्यंत कृत्रिम पाऊस पडणार, प्रक्रिया झाली पूर्ण: पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या भागात मुसळधार पाऊस चालू आहे. मात्र मराठवाडा अजूनही दुष्काळाने होरपळत आहे. मंत्रिमंडाळाच्या बैठकीत राज्यात कृत्रिम पाऊस (Artificial Rain) पाडण्याचा निर्णय झाला होता. आता 30 जुलै पर्यंत मराठवाडा परिसरात कृत्रिम पाऊस पाडला जाईल अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिली आहे. कृत्रिम पावसाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, 22 जुलैनंतर या हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो.

22 तारखेनंतर येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल त्यामुळे त्या काळात ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याबाबत पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली त्यानंतर ठोस निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यातील तीन ठीकानच्या सेंटरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कृत्रिम पावासाच्या उपक्रमासाठी सरकारने 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या महिन्याअखेरीस शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे सावट काही प्रमाणात कमी होणार आहे. (हेही वाचा: अबब! कृत्रिम पावसासाठी सरकार खर्च करणार 'इतके' कोटी रुपये)

यासाठी परवानगीचा अर्ज केंद्र सरकारकडे पाठवला आहे, लवकरच त्याची परवानगी मिळेल. तसेच औरंगाबाद विमानतळ, रडार यंत्रणा यांचीही परवानगी लवकरच मिळेल. अशाप्रकारे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर या प्रक्रियेला सुरुवात होईल. 30 जुलैच्या आत या सर्व बाबी पूर्ण होतील अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. याआधी 2003 आणि 2015 साली राज्यात कृत्रिम पाऊस पाडला गेला होता.