Jio Drive-in Theatre | प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

रिलायन्सने (Reliance) मुंबईतील (Mumbai) व्यावसायिक केंद्र वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आपले प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन जिओ वर्ल्ड ड्राइव्ह (Jio World Drive) चे अनावरण केले आहे. हा एक मॉल असून, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मेकर मॅक्‍सिटी येथे 17.5 एकर क्षेत्रात पसरलेले जिओ वर्ल्ड ड्राइव्ह हे मुंबईचे सर्वात नवीन, व्हायब्रंट, अर्बन हँगआउट प्लेस असेल. कॅम्पसमध्ये 72 प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रँड्स, जगभरातील खाद्यपदार्थांसह 27 खाण्यापिण्याची दुकाने, एक ओपन-एअर वीकेंड कम्युनिटी मार्केट अशा अनेक गोष्टी असणार आहेत.

आता परदेशाप्रमाणे भारतातही तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट ओपन थिएटरमध्ये (Drive-in Theatre) पाहता येणार आहे. रिलायन्स अशा प्रकारचा जगातील पहिला रूफ टॉप 'सिनेमा हॉल' उघडणार आहे. रिलायन्सच्या जिओ ड्राईव्ह-इन याठिकाणी हे थिएटर असणार आहे. हे पूर्णपणे ओपन एअर थिएटर असेल म्हणजे लोकांना ओपन स्पेसमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येईल. हे जगातील पहिले 'रूफ टॉप, ओपन एअर थिएटर' असेल. कोविडमुळे सिनेजगतावर झालेला परिणाम पाहता रिलायन्सचे हे पाऊल मोठे मानले जात आहे.

हे थिएटर 5 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. या ओपन एअर थिएटरमध्ये लोकांना मोकळ्या आकाशाखाली कारमध्ये बसून चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. या थिएटरमध्ये मुंबईतील सर्वात मोठी सिल्व्हर स्क्रीन असणार आहे. PVR NSE द्वारा संचालित या जिओ ड्राईव्ह-इन थिएटरमध्ये त्याच्या छतावर चित्रपट पाहण्यासाठी एकूण 290 कारची सोय असणार आहे. हे थिएटर खुल्या हवेत असल्याने लोक एकमेकांच्या संपर्कात येत नाहीत, यामुळे संसर्गाचा धोकाही कमी राहतो. (हेही वाचा: CIDCO Diwali Scheme 2021: सिडकोकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनाची घोषणा, नागरिकांसाठी निवासी-वाणिज्यिक गाळ्यांची विक्री केली जाणार)

देशात ड्राईव्ह-इन थिएटर्सची संकल्पना वेगाने विकसित होत आहे. विशेषत: कोविड महामारीनंतर, मोकळ्या वातावरणात चित्रपट पाहण्याचा हा सर्वोत्तम पर्याय बनला आहे. यामध्ये लोक आपापल्या वाहनांमध्ये सुरक्षित अंतरावर बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. सध्या देशात 6 ड्राईव्ह-इन सिनेमागृहे आहेत. त्यापैकी दोन गुडगावमध्ये आहेत. अहमदाबाद, चेन्नई, विशाखापट्टणम आणि बंगळुरू इथे प्रत्येकी एक आहे.