Devendra Fadnavis With Mother Sarita | Photo Credit: X

New Middle Name For Devendra Fadnavis:  2019 च्या विधानसभा निवडणूकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' च्या घोषणेवरून त्यांची उडवली गेलेली टिंगल ते शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देत देवेंद्र फडणवीसांनी आयत्या वेळेस पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य ठरवत स्वीकारलेली उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी. 2024 मध्ये भाजपाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. 132 जागा महाराष्ट्रात जिंकत पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची आमंत्रण पत्रिका आता सोशल मीडीयात वायरल होत आहे.

मुंबई मध्ये 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या आमंत्रणपत्रिकेमध्ये पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नावामध्ये त्यांच्या आईचाही उल्लेख दिसून आला आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या आमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री म्हणून ' देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस' मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचा उल्लेख आहे. सरिता फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री आहेत. गंगाधर हे देवेंद्र फडणवीस यांचे वडील आहेत. महाराष्ट्रात नावात वडिलांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो पण पहिल्यांदाच अधिकृत सरकारी कामात/ कागदपत्रावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावात वडिलांआधी आईच्या नावाचा उल्लेख आहे. Mother's Name Mandatory on Government Documents: आता सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक; महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा निर्णय, 1 मेपासून अंमलबजावणी .

देवेंद्र फडणवीसांनी 2014, 2019 नंतर यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणूक अ‍ॅफिडेव्हिट मध्येही देवेंद्र गंगाधर फडणवीस असा त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. यापूर्वीच्या शपथविधीतही केवळ वडीलांच्या नावाचा उल्लेख होता.

सोशल मीडीयात वायरल आमंत्रण पत्रिका

कोण आहेत देवेंद्र फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपूर मध्ये ब्राम्हण कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडील कै. गंगाधर फडणवीस हे राज्य विधानपरिषद सदस्य होते. कॅन्सरने त्यांचे निधन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस किशोरवयीन होते. गंगाधर फडणवीस हे जनसंघाचे आणि नंतर भाजपचे नेते होते. देवेंद्र फडणवीस नंतर राजकारणात आले नागपूरचे ते सर्वात लहान वयाचे महापौर झाले. पुढे आमदार झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री झाले. आता तिसर्‍यांदा फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. आज त्यांची विधिमंडळात भाजपाचे गटनेते म्हणून निवड झाली आहे. नक्की वाचा: Mumbai Traffic Diversion On Dec 5: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीत बदल; पहा कोणते मार्ग बंद .

दरम्यान विधानसभा 2024 च्या निवडणूक निकालांनंतर सरिता फडणवीस यांनी आपला मुलगा देवेंद्र फडणवीस यानेच मुख्यमंत्री व्हावं अशीच भाजपा मध्ये सार्‍यांची इच्छा असल्याची आणि आपलीही तशीच इच्छा असल्याचं म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचा मागील 5 वर्षांमधील राजकारणातला संघर्ष 2024 मधील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये संपला आहे. राजकीय पटलावर मोठं यश खेचून आणण्यामध्ये त्यांची पडद्यामागील भूमिका आणि खेळी यामुळे त्यांना अनेकदा चाणक्य आणि आधुनिक अभिमन्यू म्हणून संबोधले गेले आहे.