Indurikar Maharaj | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

आपल्या खास शैलीतील किर्तनामुळे इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) या नावाने अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या निवृत्ती काशिनाथ देशमुख (Nivrutti Kashinath Deshmukh) यांच्यावरील खटल्याची आज (बुधवार, 28 ऑक्टोबर) सुनावणी आहे. पुत्रप्राप्तीबद्दल वादग्रस्त विधान (Indurikar Maharaj Controversial Statement Case) केल्याबाबत इंदोरीकर महाराज यांच्यावर संगमनेर न्यायालयात (Sangamner Court) खटला दाखल करण्यात आला आहे. आजच्या सुनावणीत इंदोरीकर महाराज यांना दिलासा मिळणार की दणका याबाबत उत्सुकता आहे.

काय आहे प्रकरण?

एका भाषणात इंदोरीकर महाराज यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला तर मुलगी होते. अशुभ तिथीला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होते', असे वक्तव्य केले होते. नेमके याच वक्तव्याने इंदोरीकर महाराज यांना अडचणीत आणले. इंदोरीकर महाराज यांचे हे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्या वतीने संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. (हेही वाचा, Indurikar Maharaj Case: इंदोरीकर महाराज यांच्या पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त विधानाप्रकरणी आज संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी)

कोण आहेत इंदोरीकर महाराज?

इंदोरीकर महाराज नावाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असले तरी त्यांचे खरे नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. अध्यात्म आणि 'चालू' घडामोडी यांचा इंदोरीकर महाराज यांचा व्यापक अभ्यास आहे. ते हजारजबाबी असून आपल्या किर्तनातून व्यक्त होणाऱ्या स्पष्टवक्तेपणासाठी ते प्रसिद्ध आहेत. इंदोरीकर महाराज हे समाजातील विविध घटना घडामोडी यांववर तिखट शब्दात प्रहार करतात. त्यांच्या किर्तनाचा बाज हा विनोदी असला तरी त्यातील आशय हा वास्तवाला भिडणारा असतो. असे असले तरी वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. (हेही वाचा, मुला-मुलीच्या जन्माबाबत ऑड-इव्हन फॉर्म्युल्याचे वादग्रस्त विधान करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरुद्ध अहमदनगर येथे गुन्हा दाखल)

प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे निवृत्ती काशिनाथ देशमुख (इंदोरीकर महाराज) यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गावावरुन त्यांना इंदोरीकर हे नाव पडले. काही लोक त्यांचा 'उल्लेख इंदुरीकर महाराज' असाही करतात.